Join us  

सेन्सेक्स-निफ्टीने रचला इतिहास! पहिल्यांदाच ओलांडला 83000 हजारचा आकडा; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 4:48 PM

BSE Market Capitalization: शेअर बाजारातील विक्रमी उच्चांकामुळे शेअर बाजाराचे मार्केट कॅप 6.46 लाख कोटी रुपयांनी वाढून 467.22 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आज जवळपास सर्वच क्षेत्रात वाढ पाहायला मिळाली.

Stock Market Closing : महासत्ता असलेल्या अमेरिकेवर मंदीचं सावट आहे, नुकतेच जपानच्या टोकीओ शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजाराने आज इतिहास रचला आहे. गुंतवणूकदारांच्या जोरदार खरेदीमुळे, बीएसई सेन्सेक्सने 1600 अंकांच्या उसळीसह पहिल्यांदाच 83000 चा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले. निफ्टीनेही 500 हून अधिक अंकांची उसळी घेत 25,433 अंकांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. बाजारातील या उसळीचे श्रेय जागतिक शेअर बाजारातील वाढीला दिले जाते. याशिवाय बँकिंग, एनर्जी ऑटो, आयटी शेअर्सचाही या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स 1440 अंकांच्या उसळीसह 82,962 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 470 अंकांच्या उसळीसह 25,389 अंकांवर बंद झाला. यामागचं कारणही आता समोर आलं आहे.

गुंतवणूकदारांची चांदीभारतीय शेअर बाजारातील ऐतिहासिक वाढीमुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 467.22 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या सत्रात 460.76 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 6.46 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

या शेअर्समध्ये चढउतारबीएसईवर आज एकून 4 हजार 69 शेअर्सची खरेदी-विक्री झाली, ज्यामध्ये 2 हजार 335 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 1612 शेअर्स तोट्यासह बंद झाले. 122 शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. बीएसई सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 29 शेअर्स वाढीसह बंद झाले तर फक्त 1 तोट्यासह बंद झाला. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी सर्व 50 शेअर्समध्ये आज वाढ पाहायला मिळाली. वाढत्या शेअर्समध्ये हिंदाल्को 4.40 टक्के, भारती एअरटेल 4.37 टक्के, एनटीपीसी 3.90 टक्के, श्रीराम फायनान्स 3.68 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 3.26 टक्के, आयशर मोटर्स 3.14 टक्के, एनजीसी 30 टक्के, ओएनजी 30 टक्के, विप्रो 3.05 टक्के, अदानी पोर्ट्स 2.94 टक्के  वाढीसह बंद झाले. घसरलेल्या शेअर्समध्ये ग्रॅन्युल्स इंडिया १६.५२ टक्के, बायोकॉन २.२६ टक्के, अपोलो टायर्स १.०७ टक्के, गुजरात गॅस ०.८१ टक्क्यांनी घसरले.

सेक्टरॉल अपडेटआज बाजारात कुठल्याच सेक्टरने नाराज केलं नाही. सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली, त्यामुळे बाजारात सर्वत्र सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. अमेरीकन फेडरल बँक व्याजदरात कपात करण्याच्या शक्यतेने भारतीय बाजारात गुंतवणूक वाढली आहे. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक