Stock Market : जागतिक अर्थव्यवस्था थंडावत असताना भारतीय अर्थव्यवस्था जोमात दिसत आहे. शुक्रवारी (२७ सप्टेंबर) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात थोडीशी सुस्त झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी लाल आणि हिरव्या चिन्हांमध्ये अडखळताना दिसले. मात्र, बाजार उघडताच सेन्सेक्सने नवा विक्रमी उच्चांक गाठला. निर्देशांक ८५,८०० च्या वर व्यवहार करत होता. तर निफ्टी २५,२२२ च्या आसपास होता. बँक निफ्टी जवळपास ११८ अंकांनी ५४,२०० च्या वर होता. आज मेटल, फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली. कोणत्या कंपन्यांचे भाव वधारले, कुठे पडले त्यावर एक नजर.
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सकाळच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स-निफ्टीने ऐतिकासिक टप्पा ओलांडला. मात्र, नफावसुली परतल्यामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये नफा बुकिंगमुळे बाजारात ही घसरण झाली आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स २६४ अंकांनी घसरून ८५,५७१ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३७ अंकांनी घसरून २६,१७९ अंकांवर बंद झाला.
मार्केट घसरले पण मार्केट कॅप वाढलं
आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी जरी घसरले असले तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर लिस्टिंग शेअर्सचे मार्केट कॅप ४७७.९७ लाख कोटी रुपयांच्या उच्च पातळीवर बंद झाले. हे मार्केट कॅप गेल्या ट्रेडिंग सत्रात ४७७.१७ लाख कोटी रुपयांवर होता. आजच्या व्यवहारात मार्केट कॅप ८०,००० कोटी रुपयांची उसळी पाहायला मिळाली.
शेअर्समधील चढउतार
सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १५ शेअर्स वाढीसह तर १५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २९ शेअर्स वाढीसह बंद झाले तर २१ शेअर्स तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये सन फार्मा २.६७ टक्के, रिलायन्स १.७२ टक्के, टायटन १.५० टक्के, एचसीएल टेक १.३१ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.१० टक्के, एशियन पेंट्स ०.९० टक्के, एनटीपीसी ०.७३ टक्के, इंडस बँक 0.66 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.६३ टक्के, टाटा स्टील ०.५४ टक्के, मारुती ०.४९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर पॉवर ग्रिड ३.०३ टक्के, आयसीआयसीआय बँक १.८३ टक्के, भारती एअरटेल १.७४ टक्के, एचडीएफसी बँक १.६५ टक्के, कोटक महिंद्रा बँक १.५५ टक्के घसरणीसह बंद झाले.
कुठल्या क्षेत्रात काय चाललंय?
आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, एनर्जी, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. बँकिंग, एफएमसीजी, मीडिया आणि रिअल इस्टेट शेअर्स घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही प्रॉफिट बुकिंग दिसून आली.