Budget 2024 Expectations: एनडीए सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर होणार आहे. २२ जुलै रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी मोदी ३.० च्या आगामी अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गालाही मोठ्या अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात सरकार घर खरेदीदारांना मोठी भेट देऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात सरकार नव्या गृहनिर्माण योजनेची (New Housing Scheme) घोषणा करू शकते.
नव्या गृहनिर्माण योजनेची घोषणा?
सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी बजेटमध्ये घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सरकार अर्थसंकल्पात नव्या गृहनिर्माण योजनेची घोषणा करू शकते. याशिवाय घर खरेदी किंवा बांधल्यावर गृहकर्जाचे व्याजात सूटही मिळू शकते. याशिवाय गृहकर्जाच्या व्याजावर ३-६ टक्क्यांपर्यंत सबवेन्शन स्कीम जाहीर केली जाऊ शकते. नव्या योजनेत ५० लाखांपर्यंतच्या घरांवर व्याज सवलत योजना जाहीर केली जाऊ शकते, परंतु यापूर्वी १८ लाखांपर्यंतच्या घरांवर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम होती. इंटरेस्ट सबवेन्शन स्कीममध्ये घराच्या साईजबाबतही सूट मिळण्याची शक्यता आहे. सरकार सप्टेंबरपासून नवीन योजना सुरू करू शकते. झी बिझनेसनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
३ कोटी घरं बांधण्याला मंजुरी
देशातील प्रत्येकाकडे पक्की घरं असावी, त्याचा समावेश सरकारच्या प्राधान्यक्रमात आधीपासूनच करण्यात आला आहे. एनडीए सरकारने पहिल्याच बैठकीत जनतेला हे संकेत दिले आहेत. मोदी ३.० च्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी शेतकरी आणि सामान्य लोकांच्या गरजांशी संबंधित निर्णय घेतले, ज्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) ३ कोटी घरं बांधण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. सरकारनं जून २०१५ मध्ये पीएमएवाय योजना सुरू केली. ही योजना ग्रामीण भारत आणि शहरी भारत अशा दोन्ही ठिकाणी चालवली जात होती.