Budget 2024: जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर अर्थसंकल्पात तुमच्यासाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्युचर अँड ऑप्शन किंवा एफअँडओ सिक्युरिटीजवरील एसटीटी (सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स) वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर स्थानिक शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली.
काय केली घोषणा?
मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांसाठी काही वित्तीय मालमत्तेवरील कॅपिटल गेन टॅक्सची लिमिट १.२५ लाख रुपये प्रतिवर्ष करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी एफ अँड ओ (फ्युचर अँड ऑप्शन्स) वरील एसटीटी (सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स) मध्ये ०.०२ टक्के आणि ०.१ टक्के वाढ करण्याची घोषणा केली.
शेअर बाजारात घसरण
अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. अर्थमंत्र्यांनी एफ अँड ओ सिक्युरिटीजवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवल्यानंतर सेन्सेक्स १२६६.१७ अंकांनी घसरून ७९,२३५.९१ अंकांवर, निफ्टी ४३५.०५ अंकांनी घसरून २४,०७४.२० अंकांवर व्यवहार करताना दिसला.