Tata Technologies Ltd Share: ग्लोबल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे शेअर्स फोकसमध्ये असतील. गेल्या गुरुवारी, कंपनीच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1150 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. नुकताच कंपनीचा IPO आला होता आणि आता कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
डिसेंबर तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा निव्वळ नफा 14.72 टक्क्यांनी वाढून 170.22 कोटी रुपये झालाय. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 148.38 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. टाटा टेक्नॉलॉजीजनं शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर जाहीर केलेल्या या तिमाही निकालाबाबत शेअर बाजाराला ही माहिती दिली. टाटांचा हा शेअर आतापर्यंत 500 रुपयांच्या आयपीओच्या किंमतीच्या तुलनेत 130 टक्क्यांनी वधारलाय.
महसूल 1,289.45 कोटी रुपये
समीक्षाधीन तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून 1,289.45 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 1,123.89 कोटी रुपये होता. या कालावधीत, कंपनीचा एकूण खर्च गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 947.42 कोटी रुपयांवरून 1,085.14 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
2023 मध्ये आलेला आयपीओ
टाटा समूहाच्या बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ 30 नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसई वर लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सचं जबरदस्त लिस्टिंग झालं. टाटा समूहाचा हा शेअर बीएसईवर 1199.95 रुपयांवर 140% प्रीमियमसह लिस्ट झाला. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स 140% च्या प्रीमियमसह एनएसईवर 1,200 रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंग झाल्यानंतर काही वेळातच, हे शेअर्स त्यांच्या इश्यू प्राईजपासून बीएसईवर जवळपास 180 टक्क्यांनी वाढून 1398 रुपयांवर पोहोचले होते. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची किंमत 475-500 रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार, गुंतवणूकदारांनी लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी मोठा नफा कमावला. 18 वर्षांनंतर टाटा समूहाची कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. यापूर्वी 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) चे शेअर्स लिस्ट झाले होते.
(टीप- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
ड्रीम लिस्टिंगनंतर आता TATA च्या कंपनीला बंपर नफा, शेअरमध्ये २ महिन्यांत १३० टक्के वाढ
गुरुवारी, कंपनीच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1150 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 08:53 AM2024-01-29T08:53:43+5:302024-01-29T08:54:04+5:30