Join us  

CDSL Share Price Hike : 'ही' कंपनी बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंतची तेजी; गुंतवणूकदारांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:40 PM

CDSL Share Price Hike : 'ही' कंपनी बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंतची तेजी; गुंतवणूकदारांच्या उड्या

CDSL Share Price Hike : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या शेअरमध्ये शुक्रवारी शेअर बाजारात २० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. या वाढीनंतर एनएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सचा भाव २४०७.४० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कंपनीचा हा आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे.

पहिल्यांदाच बोनस शेअर्स

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागचे कारण म्हणजे बोनस शेअर्सची घोषणा. २ जुलै रोजी बोनस शेअरचा निर्णय घेण्यात येईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. याला मंजुरी मिळाल्यास कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर देणार आहे.

वर्षभरात पैसे दुप्पट

गेल्या वर्षभरात सीडीएसएलच्या शेअरमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत पोझिशनल गुंतवणूकदारांच्या पैशात ११५.४८ टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ३०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २४०७.४० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १०७६.५० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप २५,१५७.३३ कोटी रुपये आहे.

सातत्यानं मिळतोय लाभांश

कंपनी सातत्यानं लाभांश देत आहे. कंपनीनं शेवटचा एक्स-डिव्हिडंड २५ ऑगस्ट २०२३ रोजी शेअर बाजारात व्यवहार केला होता. त्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १६ रुपयांचा लाभांश दिला. तर २०२२ मध्ये कंपनीनं प्रति शेअर १५ रुपये लाभांश दिला होता.

कोणाचा किती हिस्सा?

कंपनीत प्रवर्तकांचा १५ टक्के हिस्सा आहे. तर पब्लिक होल्डिंग ५० टक्क्यांहून अधिक आहे. या कंपनीत परदेशी गुंतवणूकदारांचा ११.३८ टक्के हिस्सा आहे. या कंपनीत म्युच्युअल फंडांचा एकूण हिस्सा १३.३८ टक्के आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक