Join us  

शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात नव्या विक्रमाची शक्यता; व्याजदर वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 6:03 AM

मागील सप्ताहात बाजार अपेक्षेप्रमाणे तेजीमध्ये राहिला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४७३.२० अंशांनी वाढून २०,२६७.९० अंशावर बंद झाला

प्रसाद गो. जोशी

मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण राहिले. निफ्टीने वीस हजार अंशांचा टप्पा पार केला असून, आगामी सप्ताहात हा निर्देशांक नवीन उच्चांकी धडक मारतो काय? याकडे लक्ष राहील. स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकाने चाळीस हजार अंशांचा टप्पा ओलांडला आहे. 

मागील सप्ताहात बाजार अपेक्षेप्रमाणे तेजीमध्ये राहिला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४७३.२० अंशांनी वाढून २०,२६७.९० अंशावर बंद झाला. आगामी सप्ताहात बाजार तेजीमध्ये राहिल्यास हा निर्देशांक नवीन उच्चांक नोंदवण्याची अपेक्षा आहे. संवेदनशील निर्देशांकामध्ये २५११.१५ अंशांची वाढ झाली. सप्ताह अखेरीस हा निर्देशांक ६७४८१.१९ अंशावर पोहोचला आहे. मिडकॅपमध्ये ९७६ अंशांची वाढ झाली असून तो ३५ हजार अंशांच्या जवळ पोहोचला आहे. स्मॉलकॅप हा अन्य क्षेत्रीय निर्देशांक तुलनेने कमी म्हणजेच ७८५.५५ अंशांनी वाढ झाली आहे. सप्ताह अखेरीस हा निर्देशांक ४०,५६५.८४ अंकांवर स्थिरावला आहे. 

विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाल्याचा परिणाम आगामी सप्ताहात बाजाराच्या वाढीने होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जाहीर होणारी पीएमआयची आकडेवारी तसेच वाहन विक्रीचे आकडे  यावर बाजाराची नजर असून,  वाटचाल अवलंबून आहे. सप्ताहाच्या अखेरीस  रिझर्व्ह बँकेकडून जाहीर होणाऱ्या व्याजदराचा परिणाम आगामी सप्ताहात दिसू शकतो. अमेरिकेमधील चलनवाढ ही कमी होत असून, आगामी काळामध्ये व्याजदर वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. 

परकीय वित्त संस्थांची खरेदी पुन्हा सुरुगेले तीन महिने सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्त संस्थांकडून बाजारामध्ये पुन्हा खरेदी सुरू झाली आहे. गेल्या सप्ताहात संस्थांनी १०,५९३ कोटी रुपयांची खरेदी केली. वित्तसंस्था पुन्हा खरेदीला लागल्या आहेत. देशांतर्गत वित्त संस्थांचा खरेदीचा उत्साह कायम आहे. गतसप्ताहात या संस्थांनी ४,३५४ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत वित्त संस्थांनी बाजारात १२,७६२ कोटी रुपये ओतले आहेत.

टॅग्स :शेअर बाजार