Join us

China Stocks : भारतीय शेअर बाजारात पडझड तर चीनमध्ये पैशाचा पाऊस! मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलरने वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:31 IST

China Stocks : चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या १५ दिवसांत ३.२ ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. चीनने अलीकडेच उचललेल्या पावलांमुळे ही वाढ झाली आहे.

China Stocks : इराण-इस्रायलमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याने जगभरात शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळत आहे. भारतात तर सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. एकीकडे भारताच्या शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना शेजारी राष्ट्र चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारांत मात्र पैशांचा पाऊस पडत आहे. अवघ्या 15 व्यापार दिवसांत मार्केट कॅपमध्ये सुमारे ३.२ ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. चीनने अलीकडेच अनेक मोठे आर्थिक निर्णय घेतल्यानंतर ही वाढ झाली आहे. यामध्ये व्याजदरातील कपात आणि मंदावलेल्या क्षेत्रांना आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

आपल्या थंडावलेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी चीनने ही पावलं उचलली आहेत. चीनचे बाजार भांडवल २ ऑक्टोबरपर्यंत १०.१ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढले आहे, जे १३ सप्टेंबरपर्यंत ७.९५ ट्रिलियन डॉलर होते. या कालावधीत त्यांचे मार्केट कॅप अंदाजे २ ट्रिलियन डॉलरने वाढले आहे, जे स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहे.

या कालावधीत हाँगकाँगचे एकूण बाजार भांडवल ४.७९ ट्रिलियन डॉलरवरून ६ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे. गेल्या 15 व्यापार दिवसांमध्ये ते १.२५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त वाढले आहे. ही वाढ स्वीडन, नेदरलँड, UAE, डेन्मार्क, स्पेन आणि इंडोनेशिया सारख्या देशांच्या मार्केट कॅपच्या बरोबरीची आहे. चीन आर्थिक निर्णयानंतर शांघाय कंपोझिट इंडेक्सवरील सुमारे ३७ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती १०० टक्क्यांहून अधिक वाढल्या, तर २०० हून अधिक कंपन्यांचे शेअर्स ४० ते ८७ टक्क्यांनी वाढले. हाँगसेंग इंडेक्सवर, १९ कंपन्यांनी ५० ते १०० टक्के वाढ नोंदवली, तर ५० कंपन्यांनी १० ते ४० टक्के वाढ नोंदवली.

चीनची केंद्रीय बँक, पीपल्स बँक ऑफ चायना (PBOC) ने आपला प्रमुख व्याजदर १.७% वरून १.५% पर्यंत कमी केला आहे. तसेच, बँकांसाठी आवश्यक राखीव गुणोत्तर (RRR) ०.५० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत सुमारे १ ट्रिलियन युआन (सुमारे१४२ अब्ज डॉलर) रोख जमा झाले. या हालचालींमुळे गृहनिर्माण कर्जाचे दर सरासरी ०.५० टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. सुमारे ५ दशलक्ष कुटुंबांना याचा फायदा होण्याचा अंदाज आहे. त्यांना सुमारे १५० अब्ज युआन (२१.१ अब्ज डॉलर) व्याजाची बचत होईल.

शेअर बाजाराच्या रिकव्हरीवर भरचीनने आपल्या शेअर बाजाराला रिकव्हर करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. या अंतर्गत, दलालांसाठी ५०० अब्ज युआन (७१ अब्ज डॉलर) ची स्वॅप सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच, शेअर बायबॅकमध्ये मदत करण्यासाठी लिस्टेड कंपन्यांना पुनर्वित्त पर्याय देण्यात आले आहेत. सरकारने आपला आथिर्क खर्च वाढवला आहे. या उपायांमुळे सप्टेंबर महिन्यात CSI300 निर्देशांकात २१ टक्के वाढ झाली, ही २०१४ नंतरची सर्वात मोठी उडी आहे. शांघाय कंपोझिट १७ टक्क्यांनी वाढला, जो २०१५ नंतरची सर्वोत्तम कामगिरी आहे. हाँगकाँग इन्डेक्स देखील १७ टक्क्यांनी वाढला. नोव्हेंबर २०२२ नंतरची ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

चीनसमोर काय आव्हाने आहेत?चीनचा जीडीपी वाढीचा दर ५% च्या आसपास ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. काही काळासाठी, मालमत्ता बाजारातील मंदीमुळे आणि चीनच्या बाहेर उत्पादनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्यांमुळे त्याची आर्थिक वाढ मंदावली होती. तसेच, स्वच्छ ऊर्जेवर भर दिल्याने चीन जगातील सर्वात मोठा वाहन निर्यातदार बनला आहे. या विभागातील चीनची धोरणे आत्तापर्यंत उद्योगाला पोषक होती, त्यामुळे तेथे खप कमी होताना दिसत आहे. विश्लेषकांच्या मते, चीनच्या नव्या घोषणांमुळे शेअर बाजाराला नवी दिशा मिळाली आहे.

टॅग्स :शेअर बाजारचीनशेअर बाजारगुंतवणूक