Join us

Closing Bell: ३ दिवसांच्या घसरणीनंतर बाजार सावरला, गुंतवणूकदारांना ₹१.७१ लाख कोटींचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 4:04 PM

आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी शेअर बाजार तेजीसह बंद झाला.

आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. याआधी सलग 3 दिवस बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्सनं कामकाजाच्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी 474 अंकांची उसळी घेतली. त्याचवेळी निफ्टी 19,500 च्या पुढे पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांना आज सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. 

आजच्या व्यवहारात सर्वात जास्त फायदा आयटी, टेलिकॉम, सर्व्हिसेस आणि बँकिंग शेअर्समध्ये दिसून आला. मात्र, ऑटो आणि पॉवर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांक 0.65 टक्क्यांच्या जवळपास बंद झाले.

कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसईमधील 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 480.57 अंकांनी किंवा 0.74 टक्क्यांनी वधारून 65,240.68 वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 133.35 अंकांनी किंवा 0.70 टक्क्यांनी वधारून 19,514.65 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे 1.71 लाख कोटी वाढलेशुक्रवारी बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून 304.00 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी 302.29 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांनी वाढलं. दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

या शेअर्समध्ये वाढसेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.25 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय टेक महिंद्रा, विप्रो, भारती एअरटेल आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये 1.78 टक्के ते 2.69 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

टॅग्स :शेअर बाजार