Join us

भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 4:05 PM

Share Markets Today: प्रचंड विक्रीनंतर अखेर बुलने उसळी घेतली. मजबूत जागतिक संकेतांमुळे बाजार तेजीसह बंद झाला.

Share Markets Today : गेल्या एक महिन्यापासून सरपटत चाललेला शेअर बाजाराने आज जोरदार उसळी घेतली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालाचा सकारात्मक परिणाम शेअर मार्केटवर पाहायला मिळाला. बुधवारी (६ नोव्हेंबर) देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त वाढ झाली आहे. प्रचंड विक्रीनंतर अखेर बुलने आपली उसळी दाखवली. मजबूत जागतिक संकेतांमुळे बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी २७० अंकांनी वाढून २४,४४८ वर बंद झाला. तर सेन्सेक्स ९०१ अंकांनी वाढून ८०,३७८ वर आणि निफ्टी बँक ११० अंकांनी वाढून ५२,३१७ वर बंद झाला.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं. सुरुवातीच्या कारण ट्रेंडमध्ये ट्रम्प आघाडीवर होते. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला. आज सकाळपासून बाजारात वाढ झाली होती. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस पहिल्यापासून पिछाडीवर राहिल्या. अखेर ट्रम्प यांनी बाजी मारली. रिपब्लिकन पक्षाच्या 'ट्रंप विल फिक्स इट' या घोषणेचा भारतीय शेअर बाजारात प्रतिध्वनी ऐकायला मिळाला. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या वृत्ताने सेन्सेक्सने १००० अंकांहून अधिक उसळी घेतली. या काळात आयटी शेअर्स सर्वाधिक वधारले.

या शेअर्स चढउतारसेन्सेक्सवर एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, मारुती या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर एचसीएल टेक, इन्फोसिस, विप्रो, अपोलो हॉस्पिटल आणि टेक महिंद्राच्या शेअर्सने निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली. टायटन, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी लाईफ, आयटीसी भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

जर आपण निफ्टी ५० पॅकमधील आजच्या टॉप गेनर्सवर नजर टाकली तर, सर्व लार्जकॅप आयटी स्टॉक्स TCS, Infosys, Tech Mahindra, Wipro, HCL Tech या यादीत होते. एकूण ४% पर्यंत वाढ दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांकही ४ टक्क्यांनी वाढला. निफ्टी आयटी निर्देशांकातील ४% वाढीपैकी, पर्सिस्टंट सिस्टम्सने सर्वाधिक ५% वाढ नोंदवली. इतर IT समभाग LTTS, TCS, LTI Mindtree, Infosys, HCL Tech आणि Coforge जवळपास ४% च्या वाढीसह बंद झाले. ट्रम्प यांच्या विजयामुळे डॉलर मजबूत होईल, जो भारतीय आयटी कंपन्यांसाठी सकारात्मक घटक आहे, त्यामुळेच आज आयटी शेअर्समध्ये तेजी आली. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारडोनाल्ड ट्रम्पAmerica Election