बुधवारी शेअर बाजारात जोरदार खरेदीचं वातावरण होतं आणि संपूर्ण कामकाजादरम्यान निफ्टी आणि सेन्सेक्सनं तेजी दाखवली. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर बाजारात जोरदार वाढ झाली आणि निफ्टीनं प्राइस ॲक्शन तयार करून आपली रेझिस्टंस लेव्हल तोडली. बाजाराला दुपारनंतर उच्च पातळींवरून प्रॉफिट बुकींगच्या दबावाला सामोरं जावं लागलं असलं तरी हा दबाव फारसा नव्हता आणि निफ्टीने पुन्हा 22100 च्या पातळीवरून गती पकडली आणि शेवटच्या 15 मिनिटांत जबरदस्त वाढ दिसून आली.
आज निफ्टी 119 अंकांनी वाढून 22124 च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 526 अंकांनी वाढून 72996 च्या पातळीवर बंद झाला. आज निफ्टीनं 22,194 चा उच्चांक गाठला, पण या स्तरावरून प्रॉफिट बुकींग दिसून आलं. मात्र शेवटच्या 15 मिनिटात HDFC बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली त्यामुळे निफ्टी 50 अंकांनी वाढवला.
शेवटच्या 30 मिनिटांत, एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली. एचडीएफसी बँक लिमिटेडचा शेअर 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 1,443.65 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कामकाजादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. दरम्यान, रिलायन्सचे शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.
निफ्टी 50 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चा सर्वाधिक फायदा झाला आणि शेअर 3.56 टक्क्यांच्या वाढीसह 2985 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बजाज ऑटो, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट, एचडीएफ बँक यांचे शेअर्स निफ्टी 50 इंडेक्समध्ये सर्वाधिक वाढले. एकीकडे आज बाजाराला ऑटो आणि पॉवर क्षेत्रातील शेअर्सनं चालना दिली, तर दुसरीकडे आयटी, फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रात आज विक्रीचा दबाव होता.