Closing Bell Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स १७ अंकांच्या वाढीसह ७३८९५ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३३ अंकांनी घसरून २२४४२ अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात कोटक बँक, टीसीएस, एचयूएल आणि ब्रिटानिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर टायटन, अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल आणि कोल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. सोमवारी शेअर बाजारात मोठ्या चढ-उतारांची नोंद झाली. कामकाजादरम्यान, शेअर बाजारात ३०० अंकांची वाढही झाली होती.
टायटन आपटला
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. कमकुवत तिमाही निकालांमुळे टायटनच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली, तर कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, विप्रो, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. ओएनजीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन अँड टुब्रो आणि बीएसई लिमिटेड यांचे शेअर्स घसरले.
गौतम अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. अदानी एंटरप्रायझेसमध्ये चार टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली, तर अदानी एनर्जी सोल्युशनचे शेअर्सही किरकोळ घसरणीसह बंद झाले.
मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या आयटीसी लिमिटेड, बंधन बँक, सर्वोटेक पॉवर, कजारिया सिरॅमिक, बीसीएल इंडस्ट्रीज, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल, साऊथ इंडियन बँक, गेल, स्पाइसजेट, इरेडा, एलआयसी, गल्फ ऑईल, पेटीएम आणि पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.