Join us  

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 4:14 PM

Closing Bell Today: बुधवारी दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर अखेर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले.

Closing Bell Today: बुधवारी दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर अखेर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ६६७ अंकांनी घसरून ७४५०३ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी १८३ अंकांनी घसरून २२७०५ अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराने दिवसभराच्या कामकाजात लक्षणीय चढ-उतार नोंदवले. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये घसरण झाल्यानं शेअर बाजारातील घसरण वाढली. 

अमित शाहंनीही दिली प्रतिक्रिया 

शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. शेअर बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार अशा वेळी आपण कमी कालावधीसाठी शेअर खरेदी करणे टाळले पाहिजे. दीर्घकालीन विचार करत असाल तर शेअर बाजारात ट्रेडिंग करायला हवं. निवडणुकीच्या निकालामुळे शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकांमुळे शेअर बाजारात नफावसूली होत नाही. जर बाजारात १२००-१३०० अंकांची तेजी होत असेल तर काही घसरण होणं त्याच्या नेचरमध्ये आहे, असं ते म्हणाले. 

कोण आहेत टॉप गेनर्स / लूझर्स? 

बुधवारी शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. कामकाजाच्या अखेरिस हिंडाल्को, पॉवर ग्रिड, डिव्हिस लॅब्स, सिप्ला, बजाज ऑटो, सन फार्मा आणि भारती एअरटेलचे शेअर्स वधारले. तर एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, टाटा कन्झ्युमर, टेक महिंद्रा, बीपीसीएल, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. शेअर बाजाराच्या कामकाजात बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी फार्मा इंडेक्स वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकासह निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक घसरला. 

मल्टीबॅगर शेअर्सची आजची स्थिती 

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनलचे शेअर्स वधारले. तर कोटक महिंद्रा, एशियन पेंट्स, ओएनजीसी, एचसीएल टेक, लार्सन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो, एचडीएफसी बँक, अशोक लेलँड, इंजिनिअर्स इंडियाचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.  

गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ५ कंपन्यांचे शेअर्स बुधवारी वधारले, तर पाच कंपन्यांच्या शेअर्स घसरणीसह बंद झाले. एसीसीच्या शेअरची किंमत १.४ टक्क्यांनी घसरली, तर अदानी विल्मरचे शेअर्स जवळपास दोन टक्क्यांनी वधारले. 

टॅग्स :शेअर बाजार