Closing Bell Today: चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार विक्रमी उच्चांकी स्तरावरून घसरून बंद झाला. बीएसई सेन्सेक्स १९.८९ अंकांनी घसरून ७५३९०.५० अंकांवर बंद झाला, तर निफ्टी २४.६५ अंकांनी घसरून २२९३२.४५ अंकांवर बंद झाला. दिवसभर शेअर बाजाराच्या कामकाजात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील उत्कृष्ट निकालानंतर अशोक लेलँडच्या शेअरमध्ये बंपर वाढ दिसून आली.
कामकाजाच्या अखेरच्या तासात सेन्सेक्स-निफ्टीने सर्व तेजी गमावली. शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये इरकॉन इंटरनॅशनल, इंजिनीअर्स इंडिया, एचडीएफसी बँक, लार्सन, एचसीएल टेक, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर्स वधारले. तर टीसीएस, आयसीआयसीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ओएनजीसी आणि विप्रोचे शेअर्स घसरणीवर बंद झाले.
सोमवारी विक्रमी तेजी
सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजात पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित झाला. बीएसई सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने उच्चांक गाठला. शेअर बाजाराचं कामकाज संपल्यानंतर मात्र शेअर बाजाराने सर्व तेजी गमावली. सोमवारच्या व्यवहारात निफ्टीनं २३१०० अंकांची पातळी गाठली, त्यानंतर ती खाली आली. त्याचप्रमाणे बीएसई सेन्सेक्सने दिवसभराच्या कामकाजात ७६००९.६८ अंकांचा उच्चांक ओलांडला.
टॉप गेनर आणि टॉप लूझर कोण?
डिव्हिस लॅब, इंडसइंड बँक, एलटीआय माइंडट्री, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि लार्सन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर वाढ नोंदविण्यात आली, तर अदानी एंटरप्रायजेस, विप्रो, ओएनजीसी, ग्रासिम, एसबीआय लाइफ, आयशर मोटर्स आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदविण्यात आली. शेअर बाजाराच्या कामकाजाच्या अखेरीस बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक रेड झोनमध्ये बंद झाले.