Stock Market Closing Bell: शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी खरेदीचा कल दिसून आला आणि देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 वाढीसह बंद झाले. जरी आज बाजारात बराच चढ-उतार दिसून आला, परंतु सुरुवातीच्या व्यवहारानंतर बाजार ग्रीन झोनमध्ये राहिला आणि चांगल्या वाढीसह बंद झाला. बाजारातील तेजीत आज गुंतवणूकदारांनी 2.17 लाख कोटी रुपयांची कमाई केली.
तर दुसरीकडे तीन दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.76 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल सांगायचं झाल्यास, आज सेन्सेक्स 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 71,336.80 वर बंद झाला आणि निफ्टी 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 21,441.35 वर बंद झाला.
सेक्टरनुसार सांगायचं झाल्यास, आज निफ्टी आयटी, मीडिया आणि पीएसयू बँक वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. मात्र, त्यातही घसरण एका टक्क्यापेक्षा कमी होती. निफ्टी बँक आज 0.49 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले 2.17 लाख कोटी
बाजारातील तेजीमुळे आज गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला. 22 डिसेंबर 2023 रोजी, बीएसई वर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप 356.79 लाख कोटी रुपये होती. आज म्हणजेच 26 डिसेंबर 2023 रोजी तो 358.96 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.32 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. तर 20 डिसेंबर रोजी मार्केट कॅपचा हा आकडा 350.20 लाख कोटी रुपये होता, म्हणजेच तीन दिवसांत गुंतवणूकदारांनी बाजारातील तेजीत 8.76 लाख कोटी रुपयांची कमाई केली.
327 शेअर्स उच्चांकी स्तरावर
बीएसईवर उपलब्ध डेटानुसार, आज 4030 शेअर्सचं ट्रेडिंग झालं, त्यापैकी 2331 मध्ये तेजी दिसून आली, तर 1557 मध्ये घसरण आणि 142 मध्ये कोणताही बदल झाला नाही. तर 327 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आणि 25 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेले. याशिवाय 10 शेअर्सना अपर सर्किट तर 3 शेअर्सना लोअर सर्किट लागलं.