Join us

Closing Bell: शेअर बाजारात तेजी, Sensex ७५ हजार पार; कोल इंडिया वधारला, एचडीएफसी लाईफ घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 4:08 PM

शेअर बाजारातील कामकाज बुधवारी तेजीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 354 अंकांनी वधारून 75038 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Closing Bell Today: शेअर बाजारातील कामकाज बुधवारी तेजीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 354 अंकांनी वधारून 75038 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 92 अंकांनी वधारून 22735 अंकांच्या पातळीवर बंद झाला. या वर्षाच्या अखेरिस शेअर बाजार 85000 अंकांची पातळी गाठू शकतो, असं शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांनी सांगितलं. 

शेअर बाजारात निफ्टीच्या मिड कॅप 100 निर्देशांकात एक टक्क्याची चांगली वाढ नोंदवली गेली. निफ्टी बँक, निफ्टी आयटी, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकानं बाजारातील तेजी टिकवून ठेवण्यास मदत केली. बुधवारी मेटल शेअर्स आणि इंडेक्स हेवीवेट्समध्ये चांगली वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, भारती एअरटेल आणि बँक शेअर्सच्या वाढीमुळे शेअर बाजार तेजीसह बंद होण्यास मदत झाली. 

बँक शेअर्समध्ये तेजी 

बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजात किरकोळ चढउतार नोंदवले गेले. फार्मा आणि ऑटो शेअर्समधील घसरणीमुळे बाजार खाली आला, परंतु बँक आणि एनबीएफसी क्षेत्रातील वाढीमुळे निफ्टी चांगल्या तेजीसह बंद झाला. बुधवारी शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचे तर कोल इंडिया लिमिटेड आणि बीपीसीएलमध्ये तीन टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली. कोटक बँक आणि आयटीसीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. हिंदाल्को आणि भारती एअरटेलसह एसबीआयचे शेअर्सही दोन टक्क्यांहून अधिक वधारले. 

कोणत्या शेअर्समध्ये घसरण? 

एचडीएफसी लाईफ आणि सिप्ला यांचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. दिवीज लॅब, मारुती सुझुकी, श्रीराम फायनान्स, लार्सन अँड टुब्रो आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर, निफ्टी ऑटो-निफ्टी फार्मा वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह बंद झाले. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 1.23 टक्क्यांनी वाढला तर निफ्टी बँक, निफ्टी आयटी, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकातही वाढ झाली.

टॅग्स :शेअर बाजार