Cochin Shipyard Share Upper Circuit : सरकारी शिपबिल्डर कंपनी कोचीन शिपयार्डचा शेअर आज बाजार अपर सर्किटवर धडकला. सोमवारी व्यवहार सुरू होताच कोचीन शिपयार्डचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या आणि बाजार उघडल्यानंतर अवघ्या ६ मिनिटांनी सकाळी ०९.२१ वाजता तो अपर सर्किटवर पोहोचला.
आज सलग सातव्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. संरक्षण मंत्रालयानं आयएनएस विक्रमादित्यच्या शॉर्ट रिफिट अँड ड्राय डॉकिंगसाठी (एसआरडीडी) साठी कोचीन शिपयार्डसोबत ३० नोव्हेंबर रोजी करार केला. या कराराची किंमत १२०७.५ कोटी रुपये आहे. संरक्षण मंत्रालयाशी झालेल्या या करारानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी तेजीसह १५७६.९५ रुपयांच्या भावावर बंद झालेला कंपनीचा शेअर आज मोठ्या तेजीसह १६३०.०० रुपयांवर उघडला. व्यवहार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच कंपनीचे शेअर्स इंट्राडे नीचांकी पातळीवर १६११.०५ रुपयांवर पोहोचले होते आणि त्यानंतर सकाळी ९.२१ वाजता कंपनीच्या शेअर्सनं ५ टक्क्यांच्या वाढीसह १६५५.७५ रुपयांच्या भावावर येताच अप्पर सर्किट लागलं. मात्र, सलग ७ दिवस तेजी असूनही कंपनीच्या शेअरची किंमत ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या खाली आहे.
कंपनीला मिळालं १००० कोटींचं कंत्राट
कंपनीनं एक्स्चेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या जहाजाच्या शॉर्ट रिफिट आणि ड्राय डॉकिंगसाठी संरक्षण मंत्रालयाशी करार केला आहे. हे कंत्राट एक हजार कोटी रुपयांचे असून ते येत्या ५ वर्षांत पूर्ण होणार आहे. यापूर्वी कोचीन शिपयार्डनं सिट्रियम लेटोर्न्यू यूएसएसोबत सामंजस्य करार केला होता, ज्यात भारतीय बाजारपेठेत जॅक-अपिंगसाठी डिझाइन आणि महत्त्वपूर्ण उपकरणांचा समावेश आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)