कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडचे (Coffee Day Enterprises Ltd) शेअर्स सोमवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर आज कामकाजादरम्यान मोठ्या प्रमाणात घसरला आणि ४०.१६ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठं कारण आहे. प्रत्यक्षात ही कंपनी दिवाळखोरीत जात आहे. शुक्रवारी एनसीएलटीनं कॉफी डे ग्रुपची मूळ कंपनी कॉफी डे एंटरप्रायजेस लिमिटेड (सीडीईएल) विरोधात दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. कॉफी डे ग्रुप कॉफी हाऊसची कॅफे कॉफी डे चेन चालवतो.
काय आहे प्रकरण?
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) बंगळुरू खंडपीठानं आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेडनं (आयडीबीआय टीएसएल) दाखल केलेली याचिका ८ ऑगस्ट रोजी मान्य केली. याचिकेत २२८.४५ कोटी रुपयांच्या थकबाकीचा दावा करण्यात आला होता आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कंपनीचा कारभार पाहण्यासाठी अंतरिम रिझॉल्युशन प्रोफेशनलची नेमणूक करण्यात आली होती. सीडीईएल एक रिसॉर्टची मालकी आणि संचालन करते आणि सल्लागार सेवा प्रदान करण्याबरोबरच कॉफी बीन्सच्या व्यवसायात आहे. सीडीईएलनं रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरचं (एनसीडी) चे कूपन पेमेंट चुकवलं होतं.
बँकेनं मार्च २०१९ मध्ये प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे १,००० एनसीडी सबस्क्राइब केले होते आणि सब्सक्रिप्शनसाठी १०० कोटी रुपये भरले होते. यासाठी सीडीईएलनं आयडीबीआय टीएसएलसोबत करार केला आणि बॉन्ड धारकांसाठी डिबेंचर विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यास सहमती दर्शविली. सीडीईएलने सप्टेंबर २०१९ ते जून २०२० दरम्यान विविध तारखांना देणी असलेली एकूण कूपन देयकं भरली नाही. परिणामी, डिबेंचर विश्वस्तांनी सर्व बॉन्ड धारकांवतीनं २८ जुलै २०२० रोजी सीडीईएलला डिफॉल्टची नोटीस बजावली आणि एनसीएलटीकडे धाव घेतली. कॅफे कॉफी डेची सुरुवात दिवंगत व्हीजी सिद्धार्थ यांनी केली होती. परंतु २०१९ मध्ये आत्महत्या करत आपला जीवन प्रवास संपवला होता.
शेअर्सची स्थिती काय?
कंपनीचे शेअर्समध्ये सातत्यानं घसरण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत त्यात २० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. महिनाभरात हा शेअर २५ टक्के आणि YTDमध्ये यंदा आतापर्यंत ४० टक्क्यांनी घसरला आहे. वर्ष २०१८ मध्ये या शेअरची किंमत ३४८ रुपये होती, म्हणजेच सध्याच्या किंमतीनुसार तो आतापर्यंत ९० टक्क्यांनी तुटला आहे. कंपनीचं मार्केट कॅप ८६२.९६ कोटी रुपये आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)