Coffee Day Enterprises Ltd: दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर घसरून ३६.८० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या नवीन अॅन्युअल रिपोर्टनुसार, कॅफे कॉफी डेच्या (CCD) आउटलेट्सची संख्या गेल्या आर्थिक वर्षात कमी होऊन ४५० वर आली आहे.
मात्र, कॉर्पोरेट वर्कप्लेस आणि हॉटेल्समध्ये बसविण्यात आलेल्या व्हेंडिंग मशिनची संख्या ५२ हजार ५८१ इतकी झाली आहे. व्हॅल्यू एक्सप्रेस किऑस्कची संख्याही किरकोळ कमी होऊन २६५ वर आली आहे. कॉफी डे ग्लोबलकडे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४६९ कॅफे आणि २६८ सीसीडी व्हॅल्यू एक्सप्रेस किऑस्क होते, असंही त्यात नमूद करण्यात आलंय.
कमी होताहेत आऊटलेट्स
वार्षिक अहवालानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात सीसीडीची उपस्थिती ही घटून १४१ शहरांमध्ये आली आहे, जी गेल्या वर्षी १५४ शहरांमध्ये होती. २०२१-२२ या आर्थिक वर्षात १५८ शहरांमध्ये त्याची उपस्थिती होती. परंतु, ऑपरेशनल वेंडिंग मशीनच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, जी आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ४८,७८८ वरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ५२,५८१ पर्यंत वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ती ३८,८१० होती. कंपनीची एकूण मालमत्ता आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ५,८४९ कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये कमी होऊन ५,१०४ कोटी रुपये झाली आहे.
शेअर्सची स्थिती काय?
दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू असलेल्या या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या महिनाभरात २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. सहा महिन्यांत हा शेअर ३३ टक्के आणि या वर्षी आतापर्यंत ४५ टक्क्यांनी घसरलाय. त्यात एका वर्षात ३० टक्के तर पाच वर्षांत ४० टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, दीर्घ काळासाठी हा शेअर ३५० रुपयांवरून सध्याच्या किमतीवर घसरला आहे. १९ जानेवारी २०१८ रोजी शेअरचा भाव ३५० रुपयांच्या आसपास होता. म्हणजेच तो आतापर्यंत ९० टक्क्यांनी तुटला आहे. गेल्या महिन्यात एनसीएलटीनं कॉफी डे एंटरप्रायजेसविरोधात दिवाळखोरी कारवाईचे आदेश दिले होते.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)