Join us

लिस्टिंगनंतर सातत्यानं शेअरमध्ये लोअर सर्किट; गुंतवणूकदारांना मोठा झटका, ₹२३९ वर आला स्टॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:19 PM

या कंपनीच्या लिस्टिंगनंतर कंपनीनं गुंतवणूकदारांना निराश केलं आहे. 

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नवीन कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (JFSL) शेअर बाजारातील लिस्टिंगनं गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. सोमवारी, लिस्टिंगच्या दिवशीच शेअरमध्ये घसरण झाली आणि हा शेअर बीएसई आणि एनसईवर 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटला धडकला. मंगळवारीही घसरणीचा हा ट्रेंड कायम होता.

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशीही, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरला लोअर सर्किट लागलं आणि बीएसईवर तो घसरून 239.20 रुपयांवर आला. त्याच वेळी, एनएसईवर, स्टॉक ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह सर्किटसह 236.45 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. Jio Financial च्या लिस्टिंगपूर्वी मूल्यांकन करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या एका विशेष सत्रात शेअरची किंमत किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली होती. सध्या कंपनीचं बाजार भांडवल 1,51,970.56 रुपये आहे.

डी मर्जर प्रक्रियेअंतर्गत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस गेल्या महिन्यात रिलायन्समधून वेगळी झाली होती. मूल्य निश्चित केल्यानंतर ही कंपनी डमी म्हणून लिस्ट झाली होती. परंतु यात कोणताही व्यवहार होत नव्हता. डीमर्जर प्रक्रियेअंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना 1:1 रेशोमध्ये जिओ फायनान्शिअल्सचे शेअर्स देण्यात आले होते. रिलायन्सच्या एका शेअरच्या मोबदल्यात गुंतवणूकदारांना एक शेअर मिळाला होता.

जिओ फायनान्शिअलनं म्युच्युअल फंड उद्योग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी ब्लॅकरॉकसोबत 50:50 जॉईंट व्हेन्चरची घोषणा केली होती. या अंतर्गत दोन्ही कंपन्या 150 मिलियन डॉलर्सची सुरुवातीला गुंतवणूक करणार आहेत.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकजिओ