Join us  

Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 1:25 PM

Mukta Arts Share: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर आज इंट्राडेमध्ये २० टक्क्यांनी वधारला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे.

Mukta Arts Share: मुक्ता आर्ट्सचे शेअर्स बुधवारी व्यवहारा दरम्यान फोकसमध्ये होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर आज इंट्राडेमध्ये २० टक्क्यांनी वधारला आणि ९७.०९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. मुक्ता आर्ट्सनं पुढील सहा वर्षांसाठी झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायझेससोबत करार केला आहे.

काय आहेत डिटेल्स?

२५ ऑगस्ट २०२७ पासून ६ वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीच्या ३७ चित्रपटांच्या सॅटेलाइट आणि मीडिया राइट्ससाठी झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायजेस यांच्यात असाइनमेंट करार आणि शीट एक्झिक्युट करण्यात आली आहे, असं मुक्ता आर्ट्सनं जाहीर केलं. की  मात्र, कंपनीनं या कराराची किंमत जाहीर केलेली नाही. हा व्यवहार मागील करारापेक्षा २५ टक्के जास्त किंमतीत, तसंच कंपनी आणि झी यांच्यात झालेल्या अटी व शर्तींनुसार करण्यात आल्याचं मुक्ता आर्ट्सनं म्हटलं.

कंपनीची स्थिती काय?

कंपनीनं २०२३-२४ या आर्थिक वर्षात २७.५२ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला असून या कालावधीत कंपनीला १०.३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालाय. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीनं ७.०२ कोटी रुपयांची निव्वळ विक्री नोंदवली, तर आर्थिक वर्ष २०२५ च्या जून तिमाहीत कंपनीनं ०.९८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला. मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) माहितीनुसार, मुक्ता आर्ट्सचं मार्केट कॅप २१६.३७ कोटी रुपये आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९८.३५ रुपये तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६१ रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजार