Lokmat Money >शेअर बाजार > ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, शेअर बाजाराचे ‘वॉरेन बफे’ अशी ओळख

‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, शेअर बाजाराचे ‘वॉरेन बफे’ अशी ओळख

Rakesh Jhunjhunwala : गेल्या काही दिवसांपासून मधुमेह, हृदयविकार आणि किडनी विकारांनी ग्रासलेल्या झुनझुनवाला यांना रविवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 05:39 AM2022-08-15T05:39:56+5:302022-08-15T05:40:34+5:30

Rakesh Jhunjhunwala : गेल्या काही दिवसांपासून मधुमेह, हृदयविकार आणि किडनी विकारांनी ग्रासलेल्या झुनझुनवाला यांना रविवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. 

Death of 'Big Bull' Rakesh Jhunjhunwala, known as 'Warren Buffet' of stock market | ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, शेअर बाजाराचे ‘वॉरेन बफे’ अशी ओळख

‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, शेअर बाजाराचे ‘वॉरेन बफे’ अशी ओळख

मुंबई : भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ  गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा आणि तीन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मधुमेह, हृदयविकार आणि किडनी विकारांनी ग्रासलेल्या झुनझुनवाला यांना रविवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. 

भारतीय शेअर बाजाराचे ‘वॉरेन बफे’ अशी ओळख असलेल्या झुनझुनवाला यांचा जन्म ५ जून १९६० रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील आयकर खात्यात अधिकारी होते. शिक्षणाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या झुनझुनवाला यांनी १९८६ सालापासूनच शेअर बाजारात गुंतवणुकीस सुरुवात केली. त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स केवळ १५० अंकांवर होता. 
शेअर बाजारात पाच हजार रुपयांपासून गुंतवणुकीस सुरुवात केलेल्या झुनझुनवाला यांची संपत्ती आता ४६ हजार कोटी रुपये इतकी आहे.

भारतीय अब्जाधीशांच्या फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत ते ३६ व्या स्थानावर होते. जागतिक अर्थव्यवस्था त्याचे भारतीय अर्थकारणावर होणारे परिणाम आणि अनुषंगाने शेअर बाजारात होणाऱ्या घडामोडी यांचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. झुनझुनवाला यांनी ज्या ज्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली त्या सर्वांमध्ये त्यांना घसघशीत नफा झाला. अलीकडेच त्यांनी अकासा एअरलाईन्स नावाची विमान कंपनी सुरू केली होती.

भारतीय अर्थव्यवस्थेत असलेली क्षमता आणि भारतीय बाजारातील कंपन्या यांचे आजही यथोचित मूल्यांकन झालेले नाही. भारतीय बाजारात प्रचंड क्षमता असल्याचे त्यांचे मत होते. जर, गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर १८ ते २१ टक्क्यांचा परतावा मिळाला तर ते राजासारखे राहू शकतात, त्यामुळे भविष्याचा वेध घेत अशाच कंपन्यांत गुंतवणूक करावी, असे मत ते वारंवार त्यांच्या भाषणातून मांडत. 

अकासा एअरलाईन्सचे मालक
झुनझुनवाला यांच्या शेअर पोर्टफोलिओमध्ये ३२ कंपन्यांचा समावेश होता.  शेअर बाजारामध्ये ‘बिग बुल’ समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवालांनी हर्षद मेहताच्या कालावधीमध्ये मोठा नफा कमावला होता. त्यानंतर १९९२ साली उघडकीस आलेल्या घोटाळ्यामध्ये त्यांना मोठा फटका बसला होता. १९८७ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी रेखा झुनझुनवाला यांच्याशी लग्न केले. २००३ साली झुनझुनवाला यांनी त्यांची स्वत:ची स्टॉक ट्रेडिंग फर्म ‘रेअर एंटरप्रायझेस’ची स्थापना केली. हे नाव त्यांनी पत्नीच्या आणि स्वत:च्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून ठेवले होते.

जोखीम घेत गुंतवणूक करणारे आणि भारतीय शेअर बाजाराचे अचूक आकलन असणारे झुनझुनवाला यांचे निधन ही अतिशय दुःखद घटना आहे.
- निर्मला सीतारमन्, केंद्रीय वित्तमंत्री 

भारतीय शेअर बाजाराचा अचूक अभ्यास असलेल्या झुनझुनवाला यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. अत्यंत उमदे आणि प्रसन्न असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
- रतन टाटा, ज्येष्ठ उद्योगपती

आपल्या ज्ञानातून आणि भूमिकांद्वारे आमच्या पिढीला शेअर बाजारात असलेल्या क्षमतेवर विश्वास ठेवायला झुनझुनवाला यांनी शिकवले. त्यांच्या निधनाने मला अतीव दुःख झाले आहे.
- गौतम अदानी, ज्येष्ठ उद्योगपती

भारतीय शेअर बाजाराचे आजही यथोचित मूल्यांकन झालेले नाही हे झुनझुनवाला यांचे म्हणणे खरे आहे. भारतीय भांडवली बाजाराचे अत्यंत लक्ष्यवेधी ज्ञान त्यांच्याकडे होते.
- उदय कोटक, ज्येष्ठ बँकर

भारतीय अर्थकारणात झुनझुनवाला यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय उमदे होते. भारताच्या विकासाबद्दल ते अत्यंत आग्रही होते. त्यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हृदयविकाराचा तीव्र 
झटका आल्याने राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. त्यांना किडनीचाही गंभीर आजार होता. त्यासाठी त्यांचे डायलिसिस केले जात असे. उपचारांना ते चांगला प्रतिसादही देत होते. झुनझुनवाला यांना मधुमेह होता तसेच त्यांच्यावर अलीकडेच अँजिओप्लास्टीही झाली होती. 
- डॉ. प्रतीत समदानी, 
ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल.

Web Title: Death of 'Big Bull' Rakesh Jhunjhunwala, known as 'Warren Buffet' of stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.