Paras Defence Share: पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे शेअर्स बुधवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअरनं आज ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि हा शेअर १००८.३५ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे मोठी ऑर्डर आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स फॅक्टरीचं (ओएलएफ) चे युनिट ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स फॅक्टरीकडून (ओएलएफ) कंपनीला ४२.०५ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.
सविस्तर माहिती काय?
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, थर्मल इमेजिंग फायर कंट्रोल सिस्टिमसाठी (टीआयएफसीएस) पाच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सब-सिस्टीमचा पुरवठा करण्यात येणार आहे. पारस डिफेन्स २४ महिन्यांत याचा पुरवठा करेल. या घोषणेनंतर पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा शेअर बीएसईवर ५ टक्क्यांनी वधारून १,००८.३५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
यानंतर कंपनीचं मार्केट कॅप ४,००० कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. या ऑर्डरमुळे पारस डिफेन्सची डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्समधील पकड मजबूत झाली असून, भारताच्या संरक्षण मंत्रालयासोबतच्या भागीदारीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे.
सप्टेंबर तिमाहीतील निकाल
संरक्षण कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली. कंपनीला १२.७० कोटी रुपयांचा एकत्रित नफा झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या ८.७६ कोटी रुपयांच्या तुलनेत ४४.९ टक्क्यांनी अधिक आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत एकूण उत्पन्न ४२.२ टक्क्यांनी वाढून ८८.७६ कोटी रुपये झालं आहे, जे मागील वर्षी च्या दुसऱ्या तिमाहीत ६२.४१ कोटी रुपये होते.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)