Join us  

Defence Stocks Crash: मोदी सरकार आल्यानंतर रॉकेट बनलेले 'हे' डिफेन्स स्टॉक्स; आता अचानक आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 4:38 PM

Defence Stocks Crash: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच ५ जूनपासून संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या वादळी वाढीला आता ब्रेक लागला आहे. पाहा कोणते आहेत हे शेअर्स.

Defence Stocks Crash: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच ५ जूनपासून संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या वादळी वाढीला आता ब्रेक लागला आहे. गुंतवणूकदार आता नफा वसूल करण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसून येत आहे. गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकींग केल्यानं १९ जून रोजी संरक्षण कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. भारत डायनॅमिक्सचे शेअर्स चार टक्क्यांनी घसरले, तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स (एचएएल) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) यांचे शेअर्सही अनुक्रमे ४ आणि ३ टक्क्यांपर्यंत घसरले. 

त्याचप्रमाणे माझगाव डॉक शिपबिल्डर्स, कोचीन शिपयार्ड आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स या संरक्षण जहाज बांधणी कंपन्यांच्या शेअर्समध्येही ३ ते ५ टक्क्यांची घसरण झाली. अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स, एमटीएआर टेक्नॉलॉजीज, आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीज, झेन टेक्नॉलॉजीज, अवांटेल, पीटीसी इंडस्ट्रीज, सोलर इंडस्ट्रीज इंडिया आणि वालचंदनगर इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. मात्र, संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री होऊनही पारस डिफेन्सचे समभाग ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. 

डिफेन्स स्टॉकवर फोकस 

५ जूनपासून डिफेन्स शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी प्रमुख मित्रपक्षांचा पुरेसा पाठिंबा मिळाला आहे, ज्यामुळे मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले आहेत. मोदी सरकारने निधी वाढवून, संरक्षण बजेटचा विस्तार करून आणि संरक्षण निर्यात वाढवून संरक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलंय. राजकीय सातत्य आणि चालू असलेल्या आर्थिक सुधारणांच्या शक्यतेमुळे उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात पैसे गुंतवले आहेत आणि आता ते प्रॉफिट बुकींग करताना दिसतायत. 

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण निर्यात वाढवण्याच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रित केलंय. संरक्षणमंत्री पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी २०२८-२०२९ पर्यंत ५० हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीची संरक्षण उपकरणं निर्यात करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलंय. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर जुलैमध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण अर्थसंकल्पावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकसरकार