Join us

सरकारची एक घोषणा अन् डिफेन्स स्टॉकमध्ये तुफान तेजी; एका दिवसांत 20% वाढ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 7:46 PM

आजच्या सत्रात संरक्षण स्टॉक्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

Defense Stocks Rally : केंद्रात एनडीएची सत्ता स्थापन झाल्यानंतर शेअर बाजाराने वेग पकडला आहे. या वेगात संरक्षण क्षेत्रातील स्टॉकदेखील मोठी झेप घेत आहेत. आजच्या सत्रात संरक्षण स्टॉक्सनी दमदार परतावा दिला. या शेअर्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. या वाढीचे एक विशेष कारण आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्राबाबत एक मोठी घोषणा केल्यामुळे या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षात मोदी सरकारने संरक्षण क्षेत्रात अनेक कामे केली आहेत. भविष्यातही या क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. दरम्यान, मोदी सरकार 3.0 मध्ये पुन्हा एकदा संरक्षण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या राजनाथ सिंह यांनी पुढील पाच वर्षांत संरक्षण क्षेत्रातील निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांनी संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली. 

केंद्रीय मंत्री म्हणाले की, देशाच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असेल. आम्हाला एक मजबूत आणि 'आत्मनिर्भर' भारत विकसित बनवायचा आहे. आम्हाला देशाला संरक्षण उत्पादनात स्वावलंबी बनवायचे आहे. आतापर्यंत 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत. येत्या पाच वर्षात हा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. 

10 संरक्षण शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत वाढले

  • PTC इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी वाढ झाली. आज हा शेअर 20 टक्क्यांनी वाढून ₹ 14,930 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
  • पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढून ₹1,141 वर पोहोचले.
  • BEML शेअर्स 13 टक्क्यांनी वाढून 4,516.95 रुपये प्रति शेअर झाले.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर 3 टक्क्यांहून अधिक वाढून 310 रुपयांवर पोहोचला.
  • एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा स्टॉक सुमारे 4 टक्क्यांनी वाढून 1,897 रुपयांवर पोहोचला आहे.
  • आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी, झेन टेक्नॉलॉजीज आणि ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्सचे शेअर्स 8 टक्क्यांपर्यंत वाढले.
  • कोचीन शिपयार्डचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी वाढून 2,175 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले.
  • Mazagon डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये 17 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि 3,990 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारसंरक्षण विभागव्यवसायराजनाथ सिंह