Why share market fall : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरात कपात करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, शेअर बाजारावर या निर्णयाचा काहीच परिणाम झाला नाही. किमान बँकिंग सेक्टरमधील शेअर्स वधारण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज ०.२५ टक्क्यांनी घसरून ७७,८६० अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, एनएसई निफ्टी ०.१८ टक्के घसरणीसह २३,५५९ अंकांवर बंद झाला. अखेर या घसरणीमागे नेमकं काय कारण आहे?
शेअर बाजार का कोसळतोय?
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून डॉलर मजबूत होत आहे. परिणामी परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. डॉलर निर्देशांक सध्या १०७ च्या वर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, यूएस १० वर्षाचा ट्रेझरी ४.४३८% वर आहे. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत डॉलरचा निर्देशांक १०० च्या जवळ येत नाही आणि १० चा ट्रेझरी ४ टक्क्यांच्या खाली येत नाही, तोपर्यंत परकीय गुंतवणूकदार भारतात पैसे लावण्याची शक्यता नाही.
या शेअर्समध्ये वाढ
निफ्टी पॅकमधील शेअर्समध्ये, टाटा स्टीलमध्ये ४.२४ टक्के, आयटीसी हॉटेल्समध्ये ३.७३ टक्के, भारती एअरटेलमध्ये ३.६० टक्के, जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये ३.३५ टक्के आणि ट्रेंटमध्ये ३.०९ टक्के वाढ झाली. याशिवाय आयटीसी २.४९ टक्के, एसबीआय २.११ टक्के, ब्रिटानिया १.७० टक्के, अदानी पोर्ट्स १.५९ टक्के आणि टीसीएस १.२४ टक्क्यांनी घसरून बंद झाले.
सेक्टोरल निर्देशांकांची स्थिती
सेक्टोरल निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, आज निफ्टी मेटलमध्ये सर्वाधिक २.६६ टक्क्यांची वाढ दिसून आली. याशिवाय निफ्टी ऑटो ०.६९ टक्के, निफ्टी फार्मा ०.३१ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँक ०.०७ टक्के, निफ्टी रियल्टी ०.१० टक्के, निफ्टी हेल्थकेअर निर्देशांक ०.३२ टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स ०.९७ टक्के, निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअर ०.१४ टक्के, निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेस ०.६६ टक्के आणि निफ्टी मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉम ०.५६ टक्के वाढले. याशिवाय निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये ०.९० टक्के, निफ्टी पीएसयू बँक १.३८ टक्के, निफ्टी मीडिया १.०१ टक्के, निफ्टी आयटी ०.२३ टक्के, निफ्टी एफएमसीजी १.३० टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.५१ टक्के आणि निफ्टी बँक ०.४४ टक्क्यांनी घसरले.