Join us  

Diffusion Engineers Share Price : पहिल्याच दिवशी ₹२०० पार पोहोचला 'हा' शेअर; बाजारात एन्ट्री घेताच अपर सर्किट; ११४ पट झालेला सबस्क्राइब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 1:31 PM

Diffusion Engineers Share Price : छोट्या कंपनीनं शेअर बाजारात जोरदार एन्ट्री घेतली आहे. कंपनीचे शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजारात १५.१८ टक्के प्रीमियमसह १९३.५० रुपयांवर लिस्ट झाले

डिफ्यूजन इंजिनिअर्स या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात जोरदार एन्ट्री घेतली आहे. कंपनीचे शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजारात १५.१८ टक्के प्रीमियमसह १९३.५० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. लिस्टिंगनंतर लगेचच एनएसईवर डिफ्यूजन इंजिनिअर्सच्या शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागून ते २०३.१७ रुपयांवर पोहोचले. कंपनीचे शेअर्स बीएसईवर १८८ रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर डिफ्यूजन इंजिनिअर्सचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून १९७.३५ रुपयांवर पोहोचला. डिफ्यूजन इंजिनीअर्सचा एकूण पब्लिक इश्यू साईज १५८ कोटी रुपये होती.

११४ पटीहून अधिक सब्सक्राइब

डिफ्यूजन इंजिनिअर्सचा आयपीओ एकूण ११४.५० पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ८५.६१ पट सब्सक्राइब झाला होता. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (एनआयआय) हिस्सा २०७.६० पट, क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणीत ९५.७४ पट सब्सक्रिप्शन मिळाले. कंपनीच्या आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांचा कोटा ९५.०५ पट सब्सक्राइब झाला.

२६ सप्टेंबरपासून खुला

डिफ्यूजन इंजिनिअर्सचा आयपीओ सट्टेबाजीसाठी २६ सप्टेंबर २०२४ रोजी खुला झाला आणि ३० सप्टेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ८८ शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये किमान १४,७८४ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

काय करते कंपनी?

डिफ्यूजन इंजिनिअर्सची स्थापना १९८२ मध्ये झाली. कंपनी कोअर बिझनेससाठी वेल्डिंग कंझ्युमेबल्स, वेअर प्लेट्स आणि पार्ट्स, तसंच हेवी मशिनरी तयार करते. कंपनी हेवी मशिनरी आणि उपकरणांसाठी विशेष दुरुस्ती, रिकंडिशनिंग सेवा प्रदान करते. डिफ्यूजन इंजिनिअर्सचे प्रवर्तक प्रशांत गर्ग, नितीन गर्ग आणि चित्रा गर्ग आहेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ९३.१० टक्के होता, जो आता ६९.७० टक्के होणार आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक