Join us

Diwali Muhurat Trading 2024: दिवाळीच्या दिवशी केव्हा होणार मुहूर्त ट्रेडिंग; तुम्हीही खरेदी करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 1:58 PM

Diwali Muhurat Trading 2024: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असते. परंतु या दिवशी एका तासासाठी शेअर्स खरेदी विक्रीसाठी शेअर बाजार खुला ठेवण्यात येतो. या खास लाइव्ह ट्रेडिंग सेशनला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात.

Diwali Muhurat Trading 2024: १ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी शेअर बाजार १ तास खुला राहणार आहे. अधिकृतरीत्या १ नोव्हेंबरला सार्वजनिक बँका आणि शेअर बाजारात सुट्टी असते. मात्र, गुंतवणूकदारांसाठी खरेदी-विक्रीसाठी ट्रेडिंग विंडो केवळ एका तासासाठी खुली करण्यात येणार आहे. सर्वसाधारण भाषेत या खास लाइव्ह ट्रेडिंग सेशनला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. यंदा मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र शुक्रवार, १ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत होणार आहे.

बीएसई आणि एनएसईच्या वेबसाइटनुसार, मुहूर्त ट्रेडिंग १ नोव्हेंबर २०२४ (दिवाळी - लक्ष्मीपूजन) रोजी होईल. बीएसई आणि एनएसईवरील इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्हज, कमोडिटीज, बाँड्स आणि सध्याच्या बाजारातील व्यवहारांना या एक तासाच्या विशेष मुहूर्त लाइव्ह सत्रात परवानगी असेल. एक तासाच्या या सत्रात प्री आणि पोस्ट सेटलमेंटही होणार आहेत. सोप्या शब्दात सांगायचं तर त्या एका तासात बाजार त्याच्या नियमित ट्रेडिंग दिवसांप्रमाणेच उघडेल.

गेल्या वर्षी १२ नोव्हेंबरला मुहूर्त ट्रेडिंग

गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर २०२३ रोजी मुहूर्त ट्रेडिंग झालं होतं. त्या दिवशी ६.१५ ते ७.१५ या वेळेत शेअर बाजार खुला होता. मार्केट सेटलमेंटचं प्री आणि पोस्ट सत्र १५ मिनिटांचं होतं. एकंदरीत संध्याकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यंत शेअर बाजार खुला होता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारदिवाळी 2023