दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रेडिंगदरम्यान शेअर बाजारात जबरदस्त तेजी आली आहे. प्री-ओपन मार्केटमध्ये सेन्सेक्स 500 अंकांच्याही वर पोहोचला असून निफ्टीमध्येही तेजी दिसून आली. महत्वाचे म्हणजे, सेन्सेक्स आणि निफ्टीतील तेजी मार्केट ओपन झाल्यानंतरही कायम होती. या दरम्यान सेन्सेक्स 500 अंकांपेक्षआही अधिकच्या तेजीसह 65,400 अंकांच्याही वर व्यवहार करताना दिसला. याच प्रमाणे, निफ्टीही 100 अंकानी उसळी घेत 19,550 अंकावर व्यवहार करताना दिसला.
गुंतवणूकदार मालामाल -
शेअर बाजार ओपन होताच गुंतवणूकदारांची 3 लाख कोटी रुपयांची कमाई झाली आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला, तेव्हा बीएसईचे मार्केट कॅप 3,20,29,232.24 कोटी रुपये होते. तर आज बाजार ओपन होताच मार्केट कॅप 3,23,38,359.97 कोटी रुपयांवर पोहोले आहे. याचाच अर्थ, केवळ एका सेकंदात बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल 3,09,127.73 कोटी रुपयांची वाढ झाली आहे आणि ही गुंतवणूकदारांची कमाई आहे.
या शेअर्समध्ये आली तेजी -
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर कोल इंडियाच्या शेअर्समध्ये सुमारे 4 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. यूपीएलच्या शेअरमध्येही दीड टक्क्यांहून अधिकची वाढ दिसत आहे. ओएनजीसी, इन्फोसिस आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्येही एक टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. बीपीसीएल आणि अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स लाल रंगावर व्यवहार करत आहेत.
याशिवाय, बीएसईवर इंफोसिस आणि विप्रोच्या शेअर्समध्येही चांगली वाढ दिसत आहे. रिलायन्सचा शेअर 2329 रुपयांपेक्षाही वर पोहोचला आहे. टाटा समूहाच्या टायटन, टीसीएस आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)