Stock to Sell: गेल्या काही महिन्यांमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठं नुकसानही केलंय. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) या दोन सरकारी कंपन्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशांतर्गत ब्रोकरेज कंपनी प्रभुदास लिलाधर यांनी आपल्या एका नोटमध्ये हे शेअर्स विकण्याचा सल्ला दिलाय.
ब्रोकरेज कंपनीनं नाल्कोवर सेल रेटिंग दिलं असून त्याची टार्गेट प्राईज १४१ रुपये केलीये. जी आजच्या १८५.४० रुपयांच्या किमतीपेक्षा सुमारे २३ टक्क्यांनी कमी आहे. प्रभुदास लिलाधर यांच्या नोटवर विश्वास ठेवल्यास येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये सुमारे ४४ रुपयांची घसरण होऊ शकते. नाल्को ही नवरत्न कंपनी आहे. याची स्थापना ७ जानेवारी १९८१ रोजी भुवनेश्वर येथे झाली. खाणकाम, धातू आणि ऊर्जा क्षेत्रात एकात्मिक आणि वैविध्यपूर्ण कामकाजासह कंपनी 'अ' श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
नाल्कोच्या शेअरची हिस्ट्री
नाल्कोच्या शेअरच्या किमतीच्या हिस्ट्रीबद्दल बोलायचं झाल्यास गेल्या महिन्याभरात त्यात ७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मात्र, गेल्या ३ महिन्यांत या शेअरनं ३४ टक्क्यांहून अधिक सकारात्मक परतावा दिला आहे. त्याचा एक वर्षाचा परतावा ११७ टक्के आहे. नाल्कोबाबत इतर मार्केट एक्सपर्ट्सच्या मतांबद्दल बोलायचं झालं तर ९ पैकी २ जणांनी स्ट्राँग बायचा सल्ला दिला आहे, तर एकानं बाय रेटिंग दिलंय. तर ३ जणांनी होल्ड आणि दोन जणांनी स्ट्राँग सेलची शिफारस केली आहे आणि एकानं विक्रीची शिफारस केली आहे.
'सेल'बाबत तज्ज्ञांची चिंता
दुसरीकडे, सेलबद्दल बोलायचं झालं तर आज सकाळी ९.३० च्या सुमारास हा शेअर १.५०% वाढून १५२ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. प्रभुदास लिलाधरनं सेल रेटिंगसह याला १२७ रुपयांचं टार्गेट प्राईज दिलंय आणि ते सध्याच्या दरापेक्षा सुमारे १६ टक्क्यांनी कमी आहे. सेल देशांतर्गत बांधकाम, अभियांत्रिकी, ऊर्जा, रेल्वे, ऑटोमोटिव्ह आणि संरक्षण उद्योग, तसंच निर्यात बाजारात विक्रीसाठी बेसिक आणि स्पेशालिटी दोन्ही स्टील तयार करते.
काय म्हटलंय तज्ज्ञांनी?
गेल्या वर्षभरात ७६ टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या या सरकारी कंपनीच्या शेअर्सबाबत तज्ज्ञ बियरीश आहेत. २३ पैकी १५ जणांनी विक्रीची शिफारस केली आहे. यापैकी ११ कंपन्या स्ट्राँग सेलची शिफारस करत आहेत. याशिवाय ७ जणांनी होल्ड आणि एकानं खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर १७५.३५ रुपये आणि नीचांकी स्तर ८१.८० रुपये आहे. गेल्या महिनाभरात त्यात सुमारे १३ टक्क्यांची घसरण झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)