DOMS IPO: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतातील दुसरी सर्वात मोठी पेन्सिल उत्पादक कंपनी 'डोम्स इंडस्ट्रीज' तुम्हाला लवकरच जबरदस्त कमाई करण्याची संधी देणार आहे. डोम्स इंडस्ट्रीज 1200 कोटी रुपयांचा IPO आणण्याच्या तयारीत असून, कंपनी ऑगस्ट महिन्यात SEBI कडे IPO साठी अर्ज करण्याच्या तयारीत आहे.
डोम्स इंडस्ट्रीजच्या IPO बद्दल माहिती असलेल्या दोन इन्व्हेस्टमेंट बँकर्सनी माहिती देताना सांगितले की, डोम्स इंडस्ट्रीज IPO अंतर्गत 800 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहेत. या कंपनीत इटलीच्या F.I.L.A ग्रुपची ची 51 टक्के भागीदारी आहे. कंपनीच्या भारतीय भागधारकांमध्ये रविशिया आणि रजनी कुटुंबांचा समावेश आहे.
या पैशाचे काय होणार?
डोम्स इंडस्ट्रीज IPO मधून जमा होणारा पैसा नवीन स्टेशनरी कारखाना उभारण्यासाठी वापरणार आहे. आशिया-पॅसिफिक प्रदेशातील हा सर्वात मोठा सिंगल लोकेशन स्टेशनरी कारखाना असेल. 2022-23 ते 2027-28 या आर्थिक वर्षांमध्ये 800 कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्याची कंपनीची योजना आहे.
या गुंतवणुकीचा उद्देश कंपनीच्या वर्तमान लीज्ड प्लांटची मालकी घेणे, उत्पादन क्षमता वाढवणे आणि नवीन उत्पादनांसाठी प्लांट उभारणे हा आहे. इतकंच नाही तर कंपनी प्लांटच्या जुन्या मशिनरीचे नूतनीकरणही करणार आहे. कंपनीने JM Financial Limited, ICICI Securities, IIFL Capital Limited आणि BNP पारिबा यांना IPO साठी बँकर म्हणून नियुक्त केले आहे.
फ्लेअरचा IPOही येणार
या महिन्याच्या सुरुवातीला पेन निर्माता फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज लिमिटेडने 745 कोटी रुपयांचा IPO आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. कोविड-19 नंतर स्टेशनरी मार्केटमध्ये तेजीचा ट्रेंड दिसला आहे. त्यामुळे एकामागून एक स्टेशनरी कंपन्या आयपीओ आणण्याचा विचार करत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात डोम्स इंडस्ट्रीजचे उत्पन्न 683 कोटी रुपये होते. 2022-23 मध्ये 1212 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.