Join us

ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 2:35 PM

Waaree Energies Share Price: गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात लिस्ट झालेल्या वारी एनर्जीजच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर कमाई केली आणि आयपीओ गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. मात्र आता यात घसरण होताना दिसत आहे.

Waaree Energies Share Price: गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात लिस्ट झालेल्या वारी एनर्जीजच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर कमाई केली आणि आयपीओ गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. मात्र, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर दोन दिवसांत त्यात १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली. आजच्या बद्दल बोलायचे झाले तर दिवसभरात त्यात ७ टक्क्यापर्यंत घसरण झाली. सध्या कंपनीचा शेअर ६.६८ टक्क्यांच्या घसरणीसह ३,१२६ रुपयांवर होता. 

कामकाजादरम्या तो ७.६७ टक्क्यांनी घसरून ३१००.०० रुपयांवरही आला होता. गुंतवणूकदारांना १,५०३ रुपये दरानं हे शेअर्स अलॉट करण्यात आले आणि २३ ऑक्टोबर रोजी त्यांनी बाजारात एन्ट्री घेतली. काही दिवसांपूर्वी, ६ नोव्हेंबरला शेअर ३७४०.७५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता, म्हणजेच आयपीओमधील गुंतवणूकदारांच्या भांडवलात सुमारे १४९ टक्क्यांनी वाढ झाली.

वारी एनर्जीजचे शेअर्स का घसरले?

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रिन्यूएबल एनर्जीच्या निर्यातीत घट होण्याची भीती असल्यानं वारी एनर्जीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सर्वात मोठी समस्या त्या कंपन्यांची आहे जी निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात अमेरिकेवर अवलंबून आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी रिन्यूएबल एनर्जी प्रोडक्ट बंद करणार असल्याचं सांगितलं होतं. 

सध्या अनेक बड्या भारतीय कंपन्या अमेरिकेला सोलर मॉड्यूल निर्यात करतात आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कारण ते चीनमधून मोठ्या प्रमाणात सोलर सेल आयात करतात.

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचा परिणाम सोलार आणि रिन्यूएबल एनर्जी उपकरणांच्या भारतीय निर्यातदारांवर होऊ शकतो. मात्र, अल्पावधीत त्याचा परिणाम कमी असला, तरी मध्यम कालावधीत म्हणजेच तीन ते चार वर्षांत त्याचा परिणाम तीव्र दिसू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ चार वर्षांचा असून ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होत असून अमेरिकेतील एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन टर्मसाठी राष्ट्राध्यक्ष होऊ शकते. वारीसारख्या भारतीय कंपन्यांना, ज्यांच्या महसुलात अमेरिकेचा मोठा वाटा आहे, त्यांना आपली रणनीती बदलावी लागू शकते, असं विश्लेषकांचं मत आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक