Donald Trump At NYSE : डोनाल्ड ट्रम्प जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतील. पण व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्याआधीच ट्रम्प यांचा डंका वाजू लागला आहे. ट्रम्प स्वतः उद्योगपती आहेत. यापूर्वीही ते अमेरिकेचे अध्यक्ष राहिले आहेत. अशा परिस्थितीतही त्यांची एक इच्छा अपूर्णच राहिली होती. ती आता पूर्ण होणार आहे. गुरुवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी, डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सुरुवातीची बेल वाजवून शेअर बाजारात व्यापार सुरू करतील.
एपीच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी वॉल स्ट्रीटवर येतील आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर बेल वाजवून औपचारिकपणे दिवसाच्या व्यापाराची सुरुवात करतील. डोनाल्ड ट्रम्प यांना गुरुवारीच टाईमचे २०२४ पर्सन ऑफ द इयर घोषित केले जाऊ शकते. म्हणजेच ट्रम्प यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. सन २०१६ मध्येही, जेव्हा ते त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अध्यक्ष झाले तेव्हा मासिकाने त्यांना पर्सन ऑफ दि इयर म्हणून घोषित केले होते.
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजची बेल वाजवणे हे अमेरिकन भांडवलशाहीचे महत्त्वाचे आणि शक्तिशाली प्रतीक मानले जाते. ट्रम्प दीर्घकाळ न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहेत, अनेक दशकांपासून व्यवसायाशी संबंधित असूनही, डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची बेल वाजवण्याची मुभा मिळाली नाही. १९८५ मध्ये, रोनाल्ड रेगन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी सुरुवातीची बेल वाजवून स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार सुरू केला.
न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजने नेहमी सेलिब्रेटी आणि उद्योगातील लोकांना अधिकृतपणे ट्रेडिंग सुरू करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी आमंत्रित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी मुलांच्या भल्यासाठी त्यांच्या Be Best उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची बेल वाजवून व्यवसाय सुरू केला. गेल्या वर्षी, टाइम मॅगझिनच्या सीईओ जेसिका सिबली यांनी टेलर स्विफ्टला २०२३ साठी टाइम मॅगझिन पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यासाठी सुरुवातीची बेल वाजवली. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुरुवातीची बेल वाजवण्याची परंपरा १८०० सालापासून सुरू आहे.
IPO लाँच करणाऱ्या कंपन्या देखील लिस्टेड झाल्यावर सुरुवातीची बेल वाजवतात, जसे की भारतात BSE आणि NSE वर जेव्हा कंपनीच्या व्यवस्थापनाशी संबंधित लोक IPO च्या लिस्टिंगवर सुरुवातीची बेल वाजवून शेअर्समध्ये व्यापार सुरू करतात.
५ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या यूएस अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर, S&P ५०० निर्देशांकात २.५% वाढ झाली, जो गेल्या दोन वर्षांतील निर्देशांकासाठी सर्वोत्तम दिवस ठरला. डाऊ जोन्सने १५०८ अंकांची झेप घेतली आहे. नॅसडॅक असो की डाओ जोन्स असो किंवा एस अँड पी ५०० असो, सर्वांनी अलीकडेच विक्रमी पातळी गाठली आहे.