Dr Agarwals Healthcare IPO: सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येतोय. अशातच पुढच्या आठवड्यात एक आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. डॉ. अग्रवाल हेल्थकेअर आयपीओची प्राइस बँड जाहीर करण्यात आला आहे. कंपनीनं प्रति शेअर ३८२ ते ४०२ रुपये प्राइस बँड निश्चित केलाय. आयपीओसाठी एका लॉटमध्ये ३५ शेअर्स ठेवण्यात आलेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४,०७० रुपयांची गुंतवणूक करावी लागणारे. हा मेनबोर्ड आयपीओ २९ जानेवारीला खुला होईल आणि गुंतवणूकदारांना यात ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. ३ फेब्रुवारीला शेअर्स अलॉट होण्याची शक्यता आहे.
अग्रवाल हेल्थकेअरच्या आयपीओची साईज ३०२७.२६ कोटी रुपये आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये फ्रेश शेअर्स आणि ऑफर्स फॉर सेल या दोन्हींचा समावेश आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी फ्रेश शेअर्सच्या माध्यमातून ७५ लाख शेअर्स आणि ६.७८ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करणार आहे. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सचं लिस्टिंग ५ फेब्रुवारी होण्याची शक्यता आहे.
या आयपीओचा ५० टक्के हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी आरक्षित ठेवण्यात आलाय. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाछी ३५ टक्के आणि एनआयआयसाठी १५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आलाय.
ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये कंपनीची आयपीओ पोझिशन चांगली आहे. कंपनीचा आयपीओ आज म्हणजेच शुक्रवारी ६० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. जे ४५० रुपयांपेक्षा जास्त लिस्टिंगचे संकेत देत आहे. कंपनीने ड्राफ्ट पेपरमध्ये दिलेल्या माहितीनुसार यातील १९५ कोटी रुपयांचा वापर कर्ज फेडण्यासाठी केला जाणारे. उर्वरित आयपीओ दुसऱ्या कंपनीच्या वाढीसाठी वापरण्यात येणार आहे. डेटानुसार, ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत कंपनीत ७३७ डॉक्टर होते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)