लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी नवा उच्चांक गाठला. मंगळवारी प्रथमच ७८ हजारांची पातळी ओलांडल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने बुधवारी ६२० अंकांची झेप घेतली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीदेखील १४७ अंकांनी वधारला. सेन्सेक्स ७८,६७४ तर निफ्टी २३,८६८ या उच्चांकी पातळीवर बंद झाले. जून महिन्यातील तेजीमुळे गुंतवणूकदार तब्बल ४३ लाख काेटींनी श्रीमंत झाले आहेत.
चालू खात्यातील तूट भरुन निघाल्यामुळे शेअर बाजारात जाेरदार तेजी आली. त्याचा प्रभाव कायम आहे. बॅंका, वित्तीय संस्था आणि उर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तसेच आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा ओघ दिसून आला. सेन्सेक्सने गेल्या ४ सत्रांमध्ये तब्बल १,४६५ अंकांची झेप घेतली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांना माेठा नफा झाला आहे.
सहा महिन्यांमध्येच गाठला ७० ते ७८ हजारांचा टप्पा
लाेकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आणि जानेवारी महिन्यातील काही दिवस वगळता शेअर बाजार सातत्याने वधारला आहे. त्यामुळे बाजाराने सहा महिन्यांमध्ये ७० हजार ते ७८ हजारांचा टप्पा गाठला.
पुढे काय हाेणार? : केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार आल्यामुळे तेजी कायम आहे. बाजाराला स्थिरतेची अपेक्षा आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत सेन्सेक्स ८० हजार तर निफ्टी २५ हजारांचा टप्पा ओलांडू शकताे.