Join us  

काही मिनिटांत 7 लाख कोटींची कमाई! HDFC, Airtel ची मुसंडी; एका शक्यतेने मार्केट ऑल टाइम हायला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 4:04 PM

Share Market Update: देशांतर्गत शेअर बाजारात आज दुपारनंतर मोठी उसळी पाहायला मिळाली. तुमच्याकडे या कंपन्यांचे शेअर्स असतील तर तुमचीही लॉटरी लागली समजा.

Share Market Update: शेअर बाजारात रावाचा रंक अन् गरीबाचा राजा होण्यास वेळ लागत नाही. गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये अशीच परिस्थिती आहे. देशांतर्गत शेअर बाजारात आज दुपारी 2 नंतर जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी एक टक्क्यांहून अधिक वाढले. अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीनंतर तेथील फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात करण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे देशांतर्गत इक्विटीमध्ये परकीय गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा वाढली. दुपारी 3.10 वाजता बीएसई सेन्सेक्स 1500 हून अधिक अंकांनी वाढून 83,048 वर पोहोचला. तर निफ्टी 50 देखील सुमारे 500 अंकांनी वाढून 25,415 अंकांवर पोहोचला. या उसळीमुळे BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 6.6 लाख कोटी रुपयांनी वाढून 467.36 लाख कोटी रुपये झाले आहे. अशात तुमच्याकडे या कंपन्यांचे शेअर्स असतील तर तुम्हीही मालामाल झाले असं समजून जा.

 

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

सेन्सेक्सच्या वाढीमध्ये भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसने सुमारे 500 अंकांचा वाटा आहे. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. आयटी कंपन्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा अमेरिकेतून येतो. त्यांचे शेअर्स 1% इतके वाढले आहेत.

याशिवाय निफ्टी बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅसशी संबंधित समभागही एक टक्का वाढले. भारती एअरटेलचा शेअर चार टक्क्यांच्या वाढीसह ऑल-टाइम हायवर पोहोचला आहे. कंपनीने नुकतेच जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील सर्व 22 जिल्ह्यांमध्ये होम वाय-फाय सेवा सुरू केली आहे, त्याचा हा परिणाम असल्याचे एअरटेलने म्हटलं आहे. एचडीएफसी बँकेचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स जवळपास 2 टक्क्यांनी वधारले आहेत.

बाजारात उसळी येण्यामागे कारण काय?अमेरीका सध्या मंदिच्या सावटाखाली आहे. अशात तेथील महागाईचा दरही वाढला आहे. आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये अमेरिकेत ग्राहकांच्या किमतीत किंचित वाढ झाली होती. परंतु, महागाईत काही प्रमाणात स्थिरता होती. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात 25 अंकांनी कपात करण्याची शक्यता 66% वरून 85% पर्यंत वाढली आहे. या कपातीच्या शक्यतेमुळे देशांतर्गत इक्विटीमध्ये परकीय गुंतवणूक वाढण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळेच देशांतर्गत बाजारपेठेत वाढ झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य इन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजकुमार म्हणाले की, अमेरिकेतील चलनवाढीची आकडेवारी भारतीय बाजारासाठी सकारात्मक आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक