Royal Enfield : देशातील तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रॉयल एनफिल्ड बाइक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, या कंपनीने फक्त तरुणांनाच खुश केलं नाही तर गुंतवणूकदारानांही मालामाल केलं आहे. रॉयल एनफिल्ड निर्माता आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये गुरुवारी ७.५ टक्क्यांची जोरदार वाढ झाली. BSE वर कंपनीच्या शेअर्सने इंट्रा-डेवर ४,९३४.५० रुपयांचा उच्चांक गाठला. सप्टेंबर २०२४ ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ८% वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १,०१० कोटी रुपये होता.
गुंतवणूकदारांचा विश्वासआयशर मोटर्स लिमिटेडचे मार्केट कॅप १.३६ लाख कोटी रुपये आहे तर P/E प्रमाण ३२.५१ आहे. या गोष्टी स्टॉकची स्थिरता आणि गुंतवणूकदारांमधील आत्मविश्वास दर्शवते. या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्च किंमत ५,१०५.०० रुपये आहे तर सर्वात कमी ३,५६२.४५ रुपये आहे. कंपनीचा लाभांश उत्पन्न १.०३ टक्के आहे. कंपनीने वार्षिक आधारावर स्थिर वाढ नोंदवली. पण, तिमाही आधारावर तुलनेत काही प्रमाणात घट झाली. आयशर मोटर्सने दुचाकी विभागात स्थिर वाढ नोंदवली असली तरी हंगामी प्रभावामुळे कंपनीने उत्पन्नात चांगली वाढ केली आहे.
कंपनीचे एकूण ऑपरेशनल उत्पन्न ४,२०५ कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्के अधिक आहे. रॉयल एनफिल्डने या तिमाहीत २.२५ लाख मोटारसायकली विकल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत २.२९ लाख मोटारसायकली विकल्या होत्या. याशिवाय, कंपनीने रॉयल एनफिल्डचा नवीन ईव्ही ब्रँड फ्लाइंग फ्ली लॉन्च करून इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात पाऊल ठेवलंय. या लाँचमध्ये २ नवीन मॉडेल्स सादर करण्यात आली आहे. फ्लाइंग फ्ली सी 6 (Classic-स्टाइल) आणि फ्लाइंग फ्ली एस 6 (Scrambler-स्टाइल).
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात एन्ट्रीदेशात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा झपाट्याने प्रसार होत आहे. स्कूटरपासून बाईकपर्यंत लाखो वाहने सध्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. यामध्ये जुन्या खेळाडूंपासून नवीन दमाच्या कंपन्यांचाही समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील भविष्य ओळखून रॉयल एनफिल्डने आता इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात उडी घेतली आहे. लवकरच या कंपनीची वाहनेही रस्त्यावर धावाताना पाहायला मिळतील. लोक याला कसा प्रतिसाद देतात यावर कंपनीची वाढ अवलंबून असणार आहे. कारण, रॉयल एनफिल्ड दुचाकी आतापर्यंत त्याचा आवाज आणि भारदस्त दिसण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशा परिस्थितीत सायलेंट बाईक लोकांच्या किती पसंतीस उतरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.