Join us  

निवडणूक निकाल : Share Marketच्या घसरणीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; केली 'ही' मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:25 AM

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. परंतु आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. परंतु आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. बाजारातील प्रचंड घसरणीबाबत सेबी आणि केंद्र सरकारकडे माहिती मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीये. विशाल तिवारी नावाच्या वकिलानं ही याचिका दाखल केली आहे. 

२० लाख कोटींचे नुकसान 

"लोकसभा २०२४ च्या निकालासंदर्भात एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारानं वेग घेतला, परंतु जेव्हा प्रत्यक्ष निकाल जाहीर झाला तेव्हा बाजारात मोठी घसरण झाली. वृत्तानुसार, २० लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. यामुळे नियामक यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या न्यायालयाच्या निर्देशानंतरही काहीही बदल झालेला नाही," असं विशाल तिवारी यांनी याचिकेत म्हटलंय. 

वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील जनहित याचिकेवर न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या सूचनेवर विचार करण्यासाठी ३ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या आदेशाचा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकार आणि सेबीला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. 

केंद्र आणि सेबीनं तज्ज्ञ समितीच्या सूचनांचा रचनात्मक विचार करावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. नियामक चौकट मजबूत करण्यासाठी, गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी आणि सिक्युरिटीज मार्केटचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली पाहिजे, असंही न्यायालयानं म्हटलेलं. 

निकालाच्या दिवशी मोठी घसरण 

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालासंदर्भात एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारानं वेग पकडला, मात्र प्रत्यक्ष निकाल जाहीर होताच बाजारात घसरण झाली. शेअर बाजारातील अस्थिरता पुन्हा निर्माण झाली आहे. वृत्तानुसार २० लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. यामुळे नियामक यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं याचिकेत म्हटलंय. 

कोरोनानंतरची दिवसभरातील सर्वात मोठी घसरण 

एक्झिट पोलमध्ये भाजपला घवघवीत यश मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर बीएसई सेन्सेक्स २,५०७ अंकांनी म्हणजेच ३.४ टक्क्यांनी वधारून ७६,४६९ वर बंद झाला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि सेन्सेक्स ४,३९० अंकांनी म्हणजेच सहा टक्क्यांनी घसरून ७२,०७९ वर बंद झाला. गेल्या चार वर्षांतील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. 

प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनंही ४ जून रोजी शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा मुद्दा उपस्थित करत संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घोटाळा असल्याचं सांगत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला.

टॅग्स :शेअर बाजारसर्वोच्च न्यायालयलोकसभा निवडणूक २०२४ निकाल