Join us  

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर SBI च्या गुंतवणूकदारांना झटका; 13,075 कोटी रुपये स्वाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 6:51 PM

सुप्रीम कोर्टाने 12 मार्च रोजी इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्याचे आदेश SBI ला दिले आहेत.

Electoral Bonds: इलेक्टोरल बाँड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) मोठा झटका दिला. सर्वोच्च न्यायालयाने उद्या, म्हणजेच 12 मार्चच्या संध्याकाळपर्यंत निवडणूक रोख्यांची सर्व माहिती सार्वजनिक करण्यास सांगितले आहे. या आदेशामुळे एसबीआयच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. अवघ्या 6 तासांत गुंतवणूकदारांचे 13,075 कोटी रुपये बुडाले.

सुप्रीम कोर्टाने 15 फेब्रुवारी रोजी इलेक्टोरल बाँड प्रकरणावर सुनावणी करताना हे घटनाबाह्य घोषित केले होते. यानंतर एसबीआयला डेटा जाहीर करण्यासाठी 6 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण, एसबीआयने याचिका दाखल करुन 30 जूनपर्यंत मुदतवाढ मागितली. आज सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत एसबीआयला फटकारले. तसेच, 12 मार्च रोजी काम संपेपर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे बँकेच्या शेअरची किंमत झपाट्याने घसरली.

देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण दिसून आली. आज एकाच दिवसांत शेअरची किंमत 788.65 वरुन 773.50 रुपयांवर आली. यामुळे एकाच दिवसात बँकेच्या बाजार भांडवलात 13,075 कोटी रुपयांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात गुरुवारी SBI चे मार्केट कॅप 7,03,393.28 कोटी रुपये होते. ते सोमवारी बाजार बंद होईपर्यंत 6,90,318.73 कोटी रुपयांवर आले. 

SBI ने इतके इलेक्टोरल बाँड जारी केलेसुप्रीम कोर्टाने देशातील सर्वात मोठ्या बँकेला 2019 पासून जारी केलेल्या सर्व इलेक्टोरल बाँड्सची माहिती जारी करण्यास सांगितले आहे. देशात केवळ SBI ला इलेक्टोरल बाँड्स जारी करण्याचा अधिकार देण्यात आला होता. आतापर्यंत बँकेने सुमारे 16,518 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉण्ड जारी केले आहेत.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

 

टॅग्स :एसबीआयशेअर बाजारशेअर बाजारसर्वोच्च न्यायालय