Join us  

Elon Musk : दिवाळीपूर्वी एका घोषणेने बदललं इलॉन मस्कचं नशीब! दिवसात कमावले १ लाख ५७,००० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 12:15 PM

Elon Musk Net Worth : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असलेले मस्क आता आणखी वर गेले आहेत.

Elon Musk Net Worth : दिवाळीला काही दिवस उरले असून सगळीकडे उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळत आहे. आपल्या संपत्तीत वाढ व्हावी म्हणून दिवाळीत लक्ष्मी देवीचे पूजन केलं जातं. लक्ष्मी ज्याला प्रसन्न होते, त्याला कधीही काही कमी पडत नाही, अशी लोकांची धारणा आहे. सध्या एका व्यक्तीवर लक्ष्मी जास्तच प्रसन्न असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्यक्ती भारतीय नसून अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क आहे. मस्क सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. काल एका दिवसात त्याच्या संपत्तीत सुमारे १,५७,००० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. गुरुवारी वॉल स्ट्रीटवर टेस्ला शेअर्समध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे, त्याची एकूण संपत्ती २१ अब्ज डॉलर्सने वाढली.

इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्लाच्या नवीन इनकम रिपोर्टमुळे बाजारात मोठी वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, गुरुवारी सकाळी ११:३० पर्यंत टेस्लाच्या शेअरची किंमत १९ टक्क्यांहून अधिक वाढली होती. अमेरिकन बाजारातील गुंतवणूकदारांनी कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, जो गेल्या ८ तिमाहीत सर्वाधिक होता.

विश्लेषक काय म्हणतात?मॉर्गन स्टॅनलेचे विश्लेषक ॲडम जोनास म्हणाले की हा इनकम रिपोर्ट 'ऑटो व्यवसाय फायदेशीरपणे वाढवणे हे टेस्लासाठी प्राधान्य असल्याचे या रिपोर्टवरुन स्पष्ट होते' या रिपोर्टनंतर टेस्लाचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आणि सीईओ इलॉन मस्क यांची संपत्ती तब्बल २१ अब्ज डॉलर्स (१,५७,००० कोटी) वाढली आहे. इलॉन मस्क आता दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीपासून कोसो दूर पुढे गेले आहेत. मार्च २०२१ पासून शेअर बाजारातील टेस्लाचा हा सर्वोत्तम दिवस होता.

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील कंपनीने तिसऱ्या तिमाहीत १६,५०० कोटी रुपयांचा (सुमारे २.२ अब्ज डॉलर) नफा नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढला आहे. तर महसूल आठ टक्क्यांनी वाढून १,८७,५०० कोटी रुपये (सुमारे २५.२ अब्ज डॉलर) झाला आहे. ब्रीफिंग डॉट कॉमचे बाजार विश्लेषक पॅट्रिक ओ'हेअर म्हणाले, "टेस्लाचा अहवाल आणि त्यांच्या भविष्यातील दृष्टीकोनाबद्दलचा उत्साह प्रामुख्याने किंमती वाढवत आहे."

इलॉन मस्कच्या घोषणेचा परिणाम?बुधवारी इलॉन मस्क यांच्या एका घोषणेमुळे गुंतवणूकदारांना आणखी बळ मिळालं. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी पुढील वर्षी कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये सार्वजनिक ड्रायव्हरलेस राइड-हेलिंग सेवा सुरू करत असल्याची घोषणा मस्क यांनी केली होती. टेस्लाच्या तिमाही कमाई कॉलमध्ये मस्क म्हणाले, 'पुढील वर्षी ड्रायव्हरलेस टेस्ला वाहनांमध्ये सशुल्क राइड्स उपलब्ध होतील, असं आम्हाला वाटतं' 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कशेअर बाजारटेस्ला