Elon Musk : नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय झाला. ही निवडणूक अनेक कारणांनी गाजली. यातही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना उघड पाठिंबा दिला होता. इतकच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मस्क यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. मात्र, ट्रम्प विजयी होताच याचं रिटर्न गिफ्टही मस्क यांना मिळालं आहे. निकाल जाहिर झाल्यानंतर अवघ्या २० दिवसांत मस्क यांच्या संपत्तीत अफाट वाढ झाली आहे.
इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत १३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांची संपत्ती ३३४.३ अब्ज डॉलर्स म्हणजेच २८ लाख कोटी रुपये झाली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने त्यांच्या जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस व्यवसाय, xAI चे मूल्यांकन ५० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढल्याचे वृत्त दिल्यानंतर ही वाढ झाली आहे. मस्क यांचा AI व्यवसायात ६०% हिस्सा आहे.
२० दिवसांत संपत्तीत अफाट वाढ
फोर्ब्सच्या मते, निवडणुकीपासून मस्कच्या संपत्तीत अंदाजे ७० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. इलॉन मस्क यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केवळ 20 दिवसांत त्यांची एकूण संपत्ती ७० अब्ज डॉलर्स इतकी वाढून इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे. त्यांची झपाट्याने वाढणारी संपत्ती आता म्यानमारच्या संपूर्ण जीडीपीपेक्षा जास्त आहे. आर्थिक महासत्ता म्हणून त्यांचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.
ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. मस्क यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प यांच्या प्रचारासाठी १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले आहेत. याचं रिटर्न गिफ्टही मस्क यांना लगेच मिळालं आहे. ट्रम्प सरकारमध्ये मस्क यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे. वॉल स्ट्रीट विश्लेषकांचा असा विश्वास आहे की टेस्लाला ट्रम्प प्रशासनाच्या अपेक्षित नियमन उपायांचा खूप फायदा होईल, विशेषत: त्याच्या सेल्फ-ड्रायव्हिंग प्रोग्राममुळे फायदा होईल.
मस्क यांची टेस्लामध्ये किती टक्केवारी?
अनुमानानुसार, SpaceX च्या येऊ घातलेल्या गुंतवणुकीच्या फेरीमुळे मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये अतिरिक्त १८ अब्ज डॉलर्सची वाढ होऊ शकते, ज्यामुळे व्यवसायाचे मूल्य २५० अब्ज डॉलर्स होईल. मस्क आता २३५ अब्ज डॉलर्ससह त्यांचे मित्र आणि ओरॅकलचे प्रमुख लॅरी एलिसन यांच्यापेक्षा ८० अब्ज डॉलर्सने श्रीमंत आहेत. जे श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मस्क यांची टेस्लामध्ये १३ टक्के भागीदारी आहे.
SpaceX ची ४२% मालकी
मस्क यांच्याकडे SpaceX मध्ये ४२% हिस्सेदारी आहे. याची एकूण किंमत जूनच्या निविदा ऑफरमध्ये २१० अब्ज डॉलर्स इतकी आहे, जो त्याच्या संपत्तीचा दुसरा मुख्य स्त्रोत आहे. खासगी एरोस्पेस आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनीमध्ये मस्क यांची एकूण भागीदारी ८८ अब्ज डॉलर्स झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, आणि मानवी मेंदूचे रोपण करणारी कंपनी न्यूरालिंक या त्यांच्या इतर व्यवसायांमध्ये मस्क यांची भागिदारी कमी आहे.