Reliance Industries Ltd: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) शेअर्स गुरुवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये आहेत. मार्केट अॅनालिस्ट कंपनीच्या शेअरबाबत बुलिश असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं गुरुवारी, निफ्टी ५० हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडवरील रेटिंग बदलून 'बाय' केलं आहे. ब्रोकरेज कंपनीनं शेअरवर १४०० रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवलंय. याचा अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी बुधवारच्या १,१७७.१५ रुपयांच्या बंद किमतीपेक्षा १९% वाढ होण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती काय?
रशियावरील वाढते निर्बंध आणि अमेरिकेच्या परस्पर शुल्काच्या परिणामामुळे रिफायनिंग व्यवसायाचा दृष्टीकोन कमकुवत झाला आहे, असं ब्रोकरेज कंपनीनं म्हटलंय. यामुळे कोटकनं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा अंदाज १ टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणला आहे. या कपातीनंतरही २०२४-२०२७ या आर्थिक वर्षात ऑईल ते दूरसंचारपर्यंत समूहाचं उत्पन्न ११ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दरानं (सीएजीआर) वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पुढील काही तिमाहीत किरकोळ व्यवसायात सुधारणा होईल, टेलिकॉम व्यवसायावरील बातम्यांचा प्रवाह, आयपीओची डेडलाइन आणि आणखी एक दरवाढ हे शेअरसाठी काही प्रमुख कॅटलिस्ट ठरू शकतात, असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
इतर ब्रोकरेज कंपन्यांनी काय म्हटलं?
ब्रोकरेज फर्म जेफरीजनेही रिलायन्स इंडस्ट्रीजवर 'बाय' रेटिंग दिलं असून १६०० रुपयांचे टार्गेट प्राइस दिलंय. सध्याच्या पातळीपेक्षा ते ३६ टक्क्यांची संभाव्य वाढ दर्शवतं. जेफरीजनं संभाव्य दरवाढ, जिओचं लिस्टिंग आणि ओ २ सी व्यवसायाचा नफा सुधारणं हे शेअरसाठी काही प्रमुख ट्रिगर असल्याचे म्हटलंय.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा समावेश असलेल्या ३८ विश्लेषकांपैकी ३४ विश्लेषकांनी शेअरवर 'बाय' रेटिंग दिलंय, तर एकानं 'होल्ड' रेटिंग आणि तिघांचे शेअरवर 'सेल' रेटिंग दिलंय. टार्गेट प्राईजचा सर्वमान्य अंदाज भविष्यात स्टॉकसाठी ३१% ची संभाव्य वाढ दर्शवितो. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बुधवारी १.३ टक्क्यांनी वधारून १,१७७ रुपयांवर बंद झाला.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)