Demat Account: जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा तुमचं डिमॅट अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यापूर्वी डिमॅट खातेधारकाला ३० सप्टेंबरपर्यंत नॉमिनी फाईल करणं बंधनकारक होतं. परंतु आता सेबीनं याला मुदतवाढ दिली आहे. आता ही मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आलीये.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) सर्व वैयक्तिक डिमॅट खातेधारकांना नॉमिनी फाईल करणं अनिवार्य केलं आहे. गुंतवणूकदारांना हे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु आता त्याला मुदतवाढ देण्यात आलीये. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत नॉमिनी फाईल न केल्यास तुमचं खातं गोठवलं जाऊ शकतं.
गुंतवणूकदारांनी त्यांचे असेट्स सुरक्षित ठेवणं आणि ती त्यांच्या कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित करणं हे सेबीच्या या पावलामागील कारण आहे. बाजार नियामक सेबीनं असंही म्हटलंय की नॉमिनी दाखल करण्याचा आदेश नवीन आणि विद्यमान गुंतवणूकदारांना लागू आहे. सेबीच्या नियमांनुसार, नवीन गुंतवणूकदारांना ट्रेडिंग आणि डीमॅट खाती उघडताना त्यांच्या सिक्युरिटीजची नॉमिनी करावी लागते किंवा डिक्लेरेशन फॉर्मद्वारे नॉमिनेशन काढावं लागेल. म्हणजेच या डिक्लेरेशन फॉर्मद्वारे तुम्ही कोणालाही नॉमिनी बनवू इच्छित नाही हे सांगावं लागेल.
यापूर्वीही वाढवली डेडलाइन
जुलै २०२१ मध्ये, सेबीनं सर्व विद्यमान ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांना ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी नॉमिनी फाईल करणं अनिवार्य केलं होतं. असं करण्यात अयशस्वी झाल्यास ट्रेडिंग आणि डीमॅट खातं गोठवलं जाणार होतं. नंतर ती आणखी एका वर्षानं ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. नंतर ती वाढवून ३० सप्टेंबर २०२३ करण्यात आली. आता पुन्हा एकदा यात वाढ करून ती ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Demat अकाऊंटसाठी नॉमिनी जोडण्यासाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार काम
जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा तुमचं डिमॅट अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 02:58 PM2023-09-27T14:58:04+5:302023-09-27T14:58:18+5:30