पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर, त्याची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली. यामुळे लहान गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी डिसेंबर तिमाहीत पेटीएममधील त्यांचा हिस्सा मागील तीन महिन्यांत ८.२८ टक्क्यांवरून १२.८५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. इतकंच नाही तर कंपनीच्या भागभांडवलात २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांची संख्या गेल्या तिमाहीत ९,९०,८१९ होती, ती तिसऱ्या तिमाहीत १० लाखांहून अधिक झाली. पेटीएमच्या शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण त्यांच्यासाठी मोठा झटका ठरू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आढावा घेतला जाणार नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सोमवारी स्पष्ट केलं की पेटीएम पेमेंट्स बँकेवर (पीपीबीएल) केलेल्या कारवाईचा आढावा घेतला जाणार नाही. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, पीपीबीएलच्या कामकाजाचं सर्वसमावेशक मूल्यांकन केल्यानंतर आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. "मला स्पष्टपणं सांगायचं आहे की PPBL प्रकरणात घेतलेल्या निर्णयाचा कोणताही आढावा घेतला जाणार नाही," असं आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६०६ व्या बैठकीनंतर दास म्हणाले.
नियमांचं पालन करण्यात अपयश
नियमांचे पालन करण्यात सातत्यानं अपयशी ठरल्यानं रिझर्व्ह बँकेनं पीपीबीएलवर ही कारवाई केली आहे. यापूर्वी, ११ मार्च २०२२ रोजी, पीपीबीएलला तात्काळ प्रभावानं नवीन ग्राहक जोडण्यापासून थांबवण्यात आलं होतं. या कारवाईमध्ये, रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये, प्रीपेड उत्पादनं, वॉलेट, फास्टॅग आणि एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) कार्ड इत्यादींमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारू नयेत असं सांगितलं आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं २९ फेब्रुवारीनंतरही व्याज जमा करणं, कॅशबॅक किंवा 'रिफंड'ला परवानगी दिली आहे.
FAQ जारी करणार
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बाबतीत परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी आणि बँकेच्या ग्राहकांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँक या आठवड्यात FAQ (वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी) जारी करेल. एफएक्यूची प्रतीक्षा करा, ज्यात बँकेशी संबंधित स्पष्टीकरणांबाबत सर्व प्रकारचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं असतील. ग्राहकांची गैरसोय होऊ नये हे आमचं प्राधान्य आहे. ग्राहकांचं हित आणि ठेवीदारांचे हित आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलंय.