stock market : सप्टेंबर महिन्यात ऐतिहासिक उच्चांकावर पोहचलेल्या शेअर बाजार प्रचंड वेगाने घसरत आहे. सोमवारी शेअर बाजारात सलग ७ व्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. मार्च २०२३ नंतर पहिल्यांदाच शेअर बाजारात एवढा तोटा होत आहे. मात्र, नुकसानीची ही मालिका थांबायचं नाव घेताना दिसत नाही. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, ७ ट्रेडिंग सत्रांमध्ये सेन्सेक्स ३.७५ टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी ४ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. विशेष म्हणजे या ७ दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे २३.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामागची नेमकी कारणे काय? शेअर बाजार आणखी घसरणार का? असे प्रश्न आता गुंतवणूकदारांच्या मनात उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे, येत्या काही दिवसांत शेअर बाजारात आणखी घसरण होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. व्याजदरांबाबत फेडची भूमिका, डॉलर निर्देशांकातील वाढ, कंपन्यांची दुसऱ्या तिमाहीतील कमाई, महागाईचे वाढते आकडे आणि एफआयआयची माघार ही प्रमुख कारणे शेअर बाजाराला हानी पोहोचवू शकतात.
या ५ कारणांमुळे शेअर बाजार कोसळू शकतो
व्याजदरांबाबत फेडची भूमिका : डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अलीकडेच यूएस फेडरल रिझर्व्ह डिसेंबर महिन्यात व्याजदरांमध्ये कोणताही बदल करणार नसल्याचे जाहीर केले. पुढील वर्षीही जूनपर्यंत केवळ ५० बेसिस पॉइंट्सची कपात शक्य आहे. त्यानंतर २०२६ पर्यंत कोणताही बदल दिसणार नाही. असे झाल्यास अमेरिकन शेअर बाजारात दबाव दिसून येऊ शकतो. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होईल.
डॉलर निर्देशांकात वाढ : फेडने व्याजदरात कोणतीही कपात केली नाही म्हणजे डॉलर निर्देशांकात वाढ होणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलरच्या निर्देशांक मजबूत झाला आहे. गेल्या एका महिन्यात डॉलरच्या निर्देशांकात २ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे, ३ महिन्यांत डॉलर निर्देशांक ४.६७ टक्क्यांनी वाढला आहे. डॉलर इंडेक्स १०७ ते १०८ पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून येऊ शकतो.
भारतीय कंपन्यांकडून निराशा : भारतीय कंपन्यांची दुसऱ्या तिमाहीतील कमाई खराब झाली असून, त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत शेअर बाजारावर अधिक दिसून येईल. अनेक कंपन्या तोट्यात आहेत. रिसर्च फर्म जेफरीजच्या अहवालानुसार, १२१ कंपन्यांपैकी ६३ टक्के म्हणजे ७५ कंपन्यांच्या नफ्यात या आर्थिक वर्षात घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे देशातील कंपन्यांचे निकाल येत्या तिमाहीत खराब असू शकतात.
वाढती महागाई : भारतातील वाढत्या महागाईचे आकडे शेअर बाजारावर आणखी दबाव आणू शकतात. ऑक्टोबर महिन्यात देशातील किरकोळ महागाई ६.२१ टक्क्यांच्या १४ महिन्यांतील उच्चांकावर पोहोचली आहे. जे नोव्हेंबर महिन्यात ६ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ येत्या काही महिन्यांत महागाईने देशाला आणखी त्रास देऊ शकतो. परिणामी शेअर बाजारात घसरण दिसू शकते.
विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन : विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचे प्रमाण थोडे कमी झाले असले तरी आगामी काळात त्यात कोणताही अडथळा येण्याची चिन्हे नाहीत. सोमवारीही एफआयआयने शेअर बाजारातून सुमारे १,५०० कोटी रुपये काढले आहेत. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी २३,९१३ लाख रुपये काढले आहेत. दुसरीकडे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एकत्रितपणे विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून सुमारे १.१८ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.