मुंबई : या वर्षी शेअर बाजारात आयपीओ कमी आले असले तरीही जे काही आयपीओ आले, त्यांनी गुंतवणूकदारांना सरासरी तब्बल ५०% परतावा दिला आहे, तर सेन्सेक्स केवळ १.६ टक्के वाढला आहे.
बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञ दीपांविता मजुमदार यांनी शेअर बाजाराच्या कामगिरीच्या केलेल्या अहवालानुसार, यंदा आयपीओमधून उभारलेल्या रकमेत लक्षणीय घट झाली आहे. त्यानुसार, २०२२ मध्ये आतापर्यंत आलेल्या ५१ आयपीओमधून ३८,१५५ कोटी रुपये उभारण्यात यश आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ५५ आयपीओमधून ६४,७६८ कोटी रुपये जमा झाले होते.
यंदा केवळ आठ आयपीओंचा आकार मोठा होता. यापैकी सर्वाधिक २०,५०० कोटी रुपये भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आयपीओमधून उभारले गेले. गेल्या वर्षी ३३ कंपन्यांच्या आयपीओंमधून १,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली होती.
फायदा तर दिला, तोटा किती?
सप्टेंबर २०२१ पर्यंत आयपीओंनी ७४ टक्के परतावा दिला होता, तर त्यावेळी सेन्सेक्स २० टक्क्यांनी वाढला होता. मात्र १,००० कोटींहून अधिक आकाराच्या त्या आयपीओंपैकी १६ कंपन्यांचे शेअर्स सध्या कमी किमतीत विकले जात आहेत.
२०२१ हे वर्ष लकी ड्रॉ
२०२१ च्या संपूर्ण वर्षात कंपन्यांनी शेअर बाजारातून १,२१,६८० कोटी रुपये उभे केले होते. परंतु या काळात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत सेन्सेक्सनेही ४०,००० अंकांवरून ६०,००० अंकांच्या जवळ झेप घेतली. त्या तुलनेत, २०२२ या वर्षात बाजारात अस्थिरता आहे.