Join us  

आधी RBI, आता SEBI ची कारवाई, 'ही' कंपनी अडचणीत; ₹८७ चा आहे शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 11:43 AM

रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) या कंपनीवर कारवाई केली आहे.

जेएम फायनान्शियल लिमिटेडच्या अडचणी वाढत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) कारवाई केली आहे. सेबीनं जेएम फायनान्शिअल लिमिटेडला अयोग्य ट्रेडिंग पद्धतींमुळे डेट सिक्युरिटीजच्या कोणत्याही आयपीओसाठी लीड मॅनेजर म्हणून काम करण्यापासून निर्बंध घातले आहेत. जेएम फायनान्शिअल त्या डेट सिक्युरिटीजच्या पब्लिक इश्यूमध्ये ६० दिवसांसाठी लीड मॅनेजरच्या रुपात काम करू शकते, जे त्यांच्याकडे सद्यस्थितीत आहेत, असं सेबीनं त्यांच्या अंतरिम आदेशात म्हटलंय. 

रिझर्व्ह बँकेचीही कारवाई  

रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स लिमिटेडला आयपीओच्या विरोधात कर्ज मंजूर करणं आणि वितरणासह शेअर्स तसंच डिबेंचरसाठी कोणताही निधी देण्यास प्रतिबंध केला होता. २०२३ मध्ये नियामक नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरच्या (NCDs) सार्वजनिक समस्यांची नियमितपणे तपासणी केल्यानंतर सेबीचा आदेश आला आहे. सिक्युरिटीजच्या मोठ्या प्रमाणातील टक्केवारीची देवाणघेवाण लिस्टिंगच्याच दिवशी झाली. यामुळे रिटेल ओनरशिपमध्ये तेजीनं घसरण दिसली. एके कॅपिटल सर्व्हिसेस, जेएम फायनान्शिअल, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट आणि ट्रस्ट इनव्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स एनसीडी इश्यूचे लीड मॅनेजर होते, असं यातून समोर आलंय. 

व्यवहारांची पुढील तपासणी केल्यावर, असं आढळून आलं की, जेएम फायनान्शियलची नॉन-बँकिंग फायनान्स उपकंपनी, जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स, या वैयक्तिक गुंतवणूकदारांचे काऊंटरपार्ट्स म्हणून काम करते आणि या गुंतवणूकदारांना सब्स्क्रिप्शन घेण्यासाठी फंडदेखील दिले. याच दिवशी जेएम फायनान्शिअल प्रोडक्ट्सनं या गुंवणूकदारांकडून मिळवलेल्या सिक्युरिटीजचा मोठा भाग कॉर्पोरेट गुंतवणूकदारांना तोट्यात विकला. 

आरबीआयनं काय म्हटलेलं? 

 कंपनीच्या कर्ज प्रक्रियेतील काही गंभीर त्रुटी लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. यासोबतच आरबीआयनं म्हटलंय की, नियामक मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करण्याव्यतिरिक्त, कंपनीच्या गव्हर्नन्स समस्यांवर गंभीर चिंता आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, सबस्क्रिप्शन, डिमॅट खाती आणि बँक खात्यांसाठीच्या अर्जांशी संबंधित सर्व बाबींमध्ये, कंपनी पॉवर ऑफ ॲटर्नी आणि मास्टर कराराद्वारे काम करत होती, परंतु या करारांमध्ये ग्राहकांचा सहभाग नव्हता. परिणामी, कंपनी एक प्रकारे लोन देणाऱ्या आणि घेणाऱ्या (लेंडर्स आणि बॉरोअर्स) दोन्ही प्रकारे काम करत होती. 

शेअरमध्ये होती तेजी 

आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी जेएम फायनान्शिअल लिमिटेडच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. यादरम्यान शेअर ८७.९४ रुपयांवर बंद झाला. यापूर्वीच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर ३.१२ टक्क्यांनी वाढून बंद झाला. ट्रेडिंगदरम्यान शेअरची किंमत ८८.७९ रुपयांपर्यंत पोहोचली. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारसेबीभारतीय रिझर्व्ह बँकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग