Join us  

FirstCry IPO: महिंद्रांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा येणार IPO; ६ ऑगस्टपासून ओपन होणार; पाहा संपूर्ण डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 10:39 AM

FirstCry IPO: प्रेमजी इन्व्हेस्टमेंट, महिंद्रा, सॉफ्टबँक अशा दिग्गजांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ ६ ऑगस्टला ओपन होणार आहे. पाहा कोणता आहे हा आयपीओ आणि कधीपर्यंत करता येणार गुंतवणूक.

FirstCry IPO:  ई-कॉमर्स युनिकॉर्न फर्स्टक्रायचा आयपीओ ६ ऑगस्ट रोजी खुला होईल आणि ८ ऑगस्ट रोजी बंद होईल. या ऑफरसाठी प्राइस बँड ४४० ते ४६५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओची लॉट साइज ३२ शेअर्सची आहे. अँकर गुंतवणूकदारांना ५ ऑगस्ट रोजी बोली लावता येणार आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी शेअर्सचं बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग होईल. 

फर्स्टक्राय बेबी आणि मदर केअर प्रॉडक्ट्सची विक्री करते. कंपनीकडून या आयपीओमध्ये १,६६६ कोटी रुपयांचे ३.५८ कोटी नवे शेअर्स जारी केले जातील. तसंच २,५२७.७३ कोटी रुपयांच्या ५.४४ कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) मिळणार आहे. कंपनीला एकूण ४,१९३.७३ कोटी रुपये उभे करायचे आहेत.

फर्स्टक्रायमध्ये प्रेमजी इन्व्हेस्टमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा आणि सॉफ्टबँक यांसारख्या दिग्गज्जांची गुंतवणूक आहे. गेल्या प्रायव्हेट फंडिंग राऊंडमध्ये कंपनीचं मूल्यांकन २.८ अब्ज डॉलर्स होतं. सध्या फर्स्टक्रायमध्ये सॉफ्टबँकेचा २५.५५ टक्के, तर ब्रेनबिझ सोल्युशन्स आणि महिंद्राचा १०.९८ टक्के हिस्सा आहे. एसव्हीएफ फ्रॉग (केमन) लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, टीपीजी, पीआय अपॉर्च्युनिटीज आणि नेक्स्टजेन हे गुंतवणूकदार ओएफएसच्या माध्यमातून ते आपला हिस्सा विकत आहेत.

FirstCry IPO मध्ये रिझर्व्ह हिस्सा

फर्स्टक्राय आयपीओमध्ये पात्र क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी ७५ टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी १५ टक्के राखीव ठेवण्यात आलं आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि एव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा दाखल केलेला आयपीओ

फर्स्टक्रायची मूळ कंपनी ब्रेनबीज सोल्यूशन्सनं (BrainBees Solutions) डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा आयपीओची कागदपत्रे दाखल केली होती. परंतु नंतर भांडवली बाजार नियामक सेबीनं (Securities and Exchange Board of India) डिस्क्लोजर आणि आर्थिक बाबींबाबत अधिक तपशील मागविल्यानंतर तो मागे घेण्यात आला. त्यानंतर कंपनीने अपडेटेड आयपीओ ड्राफ्ट दाखल केला.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक