Swiggy IPO: फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीला १.२ अब्ज डॉलर्स किमतीचा IPO लॉन्च करण्यासाठी भागधारकांची मंजुरी मिळाली आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे (RoC) सादर केलेल्या नियामक फाइलिंगनुसार, स्विगीनं (Swiggy) आयपीओमध्ये (IPO) नवीन शेअर्स जारी करून ३७५० कोटी रुपये (सुमारे ४५ कोटी डॉलर्स) आणि ऑफर-फॉर-सेलद्वारे (OFS) ६,६६४ कोटी रुपये (सुमारे ८० कोटी डॉलर्स) उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. मार्च २०२२ मध्ये स्विगी आपला मेगा १ अब्ज डॉलर्सचा आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती.
Tofler आणि TheKredible च्या माध्यमातून मिळालेल्या फाइलिंगनुसार, कंपनीनं आयपीओच्या आधी अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे ७५० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. स्विगीची ईजीएम (EGM) २३ एप्रिल रोजी झाली. याच ईजीएममध्ये स्विगीनं श्रीहर्ष मजेती आणि नंदन रेड्डी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली.
स्विगी मॉल इन्स्टामार्टशी कनेक्ट होईल
स्विगी मॉलला (Swiggy Mall) त्यांच्या क्विक कॉमर्स व्यवसाय इंस्टामार्टशी जोडण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी स्विगीनं दिली होती. ग्राहकांना ग्रोसरीजच्या पलीकडे वस्तूंचा विस्तृत पर्याय देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्विगी मॉल सध्या बेंगळुरूच्या काही भागात कार्यरत आहे. स्विगी इंस्टामार्ट २५ हून अधिक शहरांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि आगामी काही महिन्यांत स्विगी मॉलचा विस्तार होईल. याची सुरुवात बंगळुरूपासून होणार असल्याचं स्विगीनं म्हटलं.