stock market : शेअर बाजारात ऑक्टोबर महिन्याने गुंतवणूकदारांसह मोठमोठ्या उद्योगपतींचीही झोप उडवली आहे. सप्टेंबर महिन्यात ऐतिसाहिक उच्चांकी पातळीवर असलेला बाजार आता निच्चांकी पातळीवर आला आहे. मात्र, ही झोप दुसऱ्यातिसऱ्या कोणी नाही तर परदेशी गुंतवणूकदारांनी उडवली आहे. ऑक्टोबरपासून एफपीआयने शेअर बाजारातून १ लाख कोटींहून अधिक रक्कम काढली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. शेअर बाजाराती त्सुनामी आली असून लाखो गुंतवणूकदारांचे यात नुकसान झाले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून सुमारे २० हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.
आठवड्यात २० हजार कोटी काढले
भारतीय इक्विटी बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) गेल्या ५ व्यापार सत्रांमध्ये जवळपास २०,००० कोटी रुपये काढून घेतले. देशांतर्गत शेअर्सच्या अधिक मूल्यमापनामुळे आणि गुंतवणूक चीनमध्ये केल्यामुळे FPI सातत्याने विक्री करत आहे. अशा परिस्थितीत, २०२४ मध्ये आतापर्यंत एफपीआय इक्विटी मार्केटमध्ये निव्वळ विक्रेते बनले आहेत. त्यांनी एकूण १३,४०१ कोटी रुपये काढले आहेत. आगामी काळात FPI विक्री सुरू राहण्याची अपेक्षा आहे. जर तिसऱ्या तिमाहीत निकाल आणि प्रमुख निर्देशक कमाईत सुधारणा झाल्यास ही परिस्थिती बदलू शकते. त्यानंतर FPI विक्रीला ब्रेक लागेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बाजारात विक्रीचा दबाव
आकडेवारीनुसार, एफपीआयने या महिन्यात आतापर्यंत १९,९९४ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे. तर ऑक्टोबर महिन्यात त्यांनी ९४,०१७ कोटी रुपये काढून घेतले होते. एफपीआयची ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री होती. याचा अर्थ ऑक्टोबरपासून आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून १,१४,०११ कोटी रुपये काढले आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी ५७,७२४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, चालू वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून १३,४०१ कोटी रुपये काढून घेतले आहेत. नुकतेच चीन सरकारने नवीन आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार चीनकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळेच एफपीआय भारतीय इक्विटीमधून बाहेर पडत आहे.
बाँड मार्केटमध्ये गुंतवणूक वाढतेय
दुसरीकडे, परदेशी गुंतवणूकदार भारताच्या बाँड मार्केटमध्ये सतत पैसे गुंतवत आहेत. गेल्या आठवडाभरात विदेशी गुंतवणूकदारांनी ५९९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर गेल्या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी रोखे बाजारातून ४,४०६ कोटी रुपये काढले आहेत. मात्र, चालू वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत १,०६,४४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ऑक्टोबर महिन्यापूर्वी विदेशी गुंतवणूकदार सलग ५ महिने बाँड मार्केटमध्ये गुंतवणूक करत होते.